Wed, Apr 24, 2019 19:49होमपेज › Belgaon › ‘दारूबंद’ बेळवट्टीत पोलिसांची दहशत

‘दारूबंद’ बेळवट्टीत पोलिसांची दहशत

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:26AMबेळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील बेळवट्टी गावात ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने दारूबंदीचा निर्णय घेतल्यानंतर गावात आता पोलिसांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न चालवला आहे. परिणामी, ग्रामस्थांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.पोलिसांनी धाव घेऊन दारूबंदी मागे घ्यावी, म्हणून प्रयत्न चालविले आहेत. यामुळे ग्रामस्थांनी बैठक घेऊन ग्रा. पं. सदस्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचाही इशारा दिला आहे. बेळवट्टी ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावात दारूबंदी, डॉल्बीबंदी असे निर्णय घेतले आहेत. दारू पिणार्‍यांना तसेच विक्री करणार्‍याला दंड ठोठावण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही देण्यात  आले. 

तथापि, गावातील एकाने दारूविक्री करण्याचा प्रयत्न चालविला होता. त्याला ग्रामस्थांनी समज दिल्यानंतरही त्याने  न ऐकल्याने गावकर्‍यांनी त्याच्याशी संबंध तोडले. त्यामुळे सदर व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी गावात ठाण मांडले असून गावकर्‍यांनी बहिष्कार मागे घ्यावा, यासाठी दबाव आणण्यात येत आहे. तथापि, असे करताना पोलिसांनी दारुबंदी करणार्‍या ग्रामस्थांना साथ देण्याऐवजी त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी करून पोलिस कारवाईच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून सामूहिक राजीनामे देण्याचा ठराव ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आला. 

गावातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करण्याऐवजी दारुविक्रेत्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पोलिसाकडून होत आहे. याचा निषेध बैठकीत करण्यात आला. मतदानावर बहिष्कारबेळवट्टी गाव स्थलांतरित आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बेळवट्टी गाव विस्थापित करण्यात आले. मात्र सरकार दरबारी त्याची नोंद नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. गावाची नोंद धरणग्रस्त म्हणून करण्यात यावी, असा ठराव अनेकवेळा केला आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने चालविलेली दहशत कमी करावी. त्याचबरोबर गावाची नोंद धरणग्रस्त म्हणून करावी, या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार घालण्यात येणार आहे. 

Tags : Belgaum, Police, panic,  liquor, belt