Thu, May 23, 2019 04:30होमपेज › Belgaon › कर्जबाजारी शेतकर्‍यांना दिलासा

कर्जबाजारी शेतकर्‍यांना दिलासा

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 07 2018 1:04AMबेळगाव : प्रतिनिधी

कर्जबाजारी असणारे छोटे शेतकरी, शेतमजूर, गरीबांना कर्जफेडीसाठी छळू नये, बेकायदेशीरपणे त्यांच्यावर दबाव टाकू नये, अशी सूचना पोलिस महासंचालक निलमणी राजू यांनी दिली आहे. तसे परिपत्रक सर्व पोलिस ठाण्यांना पाठविण्यात आले आहे.

1980 च्या काळात कर्जमुक्‍तीचा कायदा अस्तित्वात होता. तसाच कायदा आता लागू करण्याची तयारी राज्यातील काँग्रेस-निजद युती सरकार करत आहे. त्यामुळे पोलिस महासंचालकांच्या परिपत्रकाला विशेष महत्त्व प्राप्‍त झाले आहे.  खासगी सावकार, आर्थिक संस्थांकडून अनेक शेतकर्‍यांनी, शेत मजुरांनी कर्ज घेतले आहे. कर्जफेडीसाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे राज्यात विविध ठिकाणी शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे कर्जमुक्‍तीचा कायदा लागू करण्यासाठी तयारी केली जात आहेे. 

दामदुप्पट व्याज आकारणे, शेतकर्‍यांचा कर्जफेडीसाठी छळ करणे अशा तक्रारी आल्या तर त्याविषयी गांभीर्याने कारवाई करण्याची सूचना परिपत्रकात देण्यात आली आहे. प्रत्येत जिल्ह्यात, शहर पातळीवर सहाय्यवाणी  केंद्र स्थापन करण्यात आले आहे. चोवीस तास ते सुरू ठेवावे. तेथे आलेल्या तक्रारी, समस्या सोडविण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकाची नेमणूक करावी. तक्रारी सोडविण्यास विलंब झाला तर जिल्हा पातळीवर अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक  आणि शहरामध्ये पोलिस उपायुक्‍तांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे परिपत्रकात सांगण्यात आले आहे.