Mon, Jul 15, 2019 23:42होमपेज › Belgaon › ...अन्‌ पोलिसाने मतदाराला ठोकला सॅल्युट 

...अन्‌ पोलिसाने मतदाराला ठोकला सॅल्युट 

Published On: May 13 2018 2:12AM | Last Updated: May 12 2018 11:12PMबेळगाव : प्रतिनिधी

शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास कुद्रेमानी मतदान केंद्रावर धामधुमीत सुरू होती. इतक्यात अंगावर सफारी ड्रेस परिधान केलेल्या रुबाबदार युवकाने केंद्रावर प्रवेश केला. रात्रीच्या जागरणामुळे आळसावलेल्या  पोलिसांना हा युवक पाहून घाम फुटला. त्यांनी खुर्चीवरून उठून खाडकन सॅल्यूट ठोकला.

या प्रकारामुळे मतदान करण्यासाठी रांगेत थांबलेले मतदार गोंधळात पडले. गावातील हा युवक पाहून पोलिसांनी कशासाठी सॅल्यूट ठोकला, याचे कोडे उलगडेना. त्यामुळे तेही गोंधळात पडले. सारेजण आश्‍चर्याने एकमेकाकडे पाहू लागले. 

पोलिस फुटलेला घाम पुसत त्या युवकाच्या मागोमाग गेले. तो युवक मतदानाच्या रांगेत जाऊन  थांबला. हा प्रकार पाहताच पोलिसांना खरा प्रकार समजला. त्या युवकाकडे पाहून एखादा निवडणूक अधिकारी असावा, असा पोलिसाचा समज झाला होता. मात्र खरा प्रकार उघडकीस येताच तेे खजिल बनले. अधिकारी समजून त्यांनी एका मतदाराला चक्‍क सॅल्यूट ठोकला. मतदारांनाही घडलेला प्रकार लक्षात आला. पोलिसाचा पोपट झालेला पाहून मतदारामध्ये खसखस पिकली होती.  

Tags : karnataka, Election, 2018, Police, Voter,