Wed, Jan 23, 2019 13:12होमपेज › Belgaon › महाराष्ट्र-गोवा सीमा सील करण्याच्या हालचाली

महाराष्ट्र-गोवा सीमा सील करण्याच्या हालचाली

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 08 2018 10:40PMबेळगाव : प्रतिनिधी

आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी पोलिस प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून, पोलिस आयुक्‍त डी. सी. राजाप्पा यांनी पोलिस आयुक्‍तालय विभागात येणार्‍या महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमा सील करण्याविषयी चाचपणी केली. 

लवकरच गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची बैठक होणार आहे. त्यासाठी राजाप्पा यांनी गुरुवारी बेळगावपासून काही अंतरावर असलेल्या सीमा परिसरांची पाहणी केली. बेळगावकडून गोव्याकडे जाणार्‍या पिरनवाडी, किणये, कर्ले तसेच बेळगावहून सावंतवाडीकडे जाणार्‍या शिनोळी मार्गांची, तसेच सीमांची त्यांनी पाहणी केली.

निवडणूक काळात परराज्यांतून येणारे गुन्हेगार, हवालामार्फत होणारा व्यवहार, शस्त्रास्त्रे, मद्यपुरवठा व अन्य बेकायदेशीर कामांना चाप लावण्यासाठी दोन्ही राज्यांदरम्यानच्या सीमा सील करण्याचा निर्णय राजाप्पा यांनी घेतल्याचे कळते. महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर पोलिसांची जादा कुमक ठेवण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे कळते. दोन राज्यांच्या सीमा सीलसंदर्भात राजाप्पा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.