होमपेज › Belgaon › घे प्रतिज्ञा मतदारा... पात्र ज्यांच्या, दे सत्ताप्रचाराचा उडाला धुरळा

घे प्रतिज्ञा मतदारा... पात्र ज्यांच्या, दे सत्ताप्रचाराचा उडाला धुरळा

Published On: May 11 2018 1:11AM | Last Updated: May 10 2018 9:06PMप्रचाराचा उडाला धुरळा,

कार्यकर्ता आहे जुंपला
जो तो विचार करतो आहे
उमेदवार गणित मांडतो आहे...

भुर्रकन उडाले दिवस सारे
पैसा वाटण्यात मश्गुल सारे
माया आली कोठून एवढी
कानावर मात्र हात तयांचे...

सभा, बैठका, रॅली झाल्या
उमेदवार घामाघूम
स्वप्नी दिसते सगळ्यांना
आली विजयश्री दारी पाहा...

मतदान अजूनि आहे दूर
भुलवाया, फितवाया ते आतुर
सुरू आहे तयारी त्यांची
खलबते....चढाओढीची...

कत्तलरात्री काय करावे
सोशल मीडिया हाताशी
संदेश काय पाठवावे
मसलत चाले नेत्यांशी...

आता आहे लगीनघाई
तोवर मतदारांची चलती
पक्षांना वाटते चालेल जादू
जलद उठाबशा काढू...

प्रस्थापितांविरुध्द शड्डू
नवोदितांचा आहे लढा
अपक्षांचा वाजे ढोल
येईल त्यांना नंतर मोल...

बंडोबांचा सवतासुभा
डोकेदुखी पक्षांना
कुठे शाप बेकीचा
आहे कोण बरे सच्चा?

आश्वासने तीच ती
बाटली नवी दारू जुनी
हीच आहे पध्दत अजुनी
कोणीही असो तंत्र-ज्ञानी!

आले रथी-महारथी
ढोल अपुले वाजवती
नुसत्याच गप्पा खिरापती
चिन्ह, झेंडे मिरवती...

गर्दी लोटते, मतांचे काय? 
नशिबी कुणाच्या हाय हाय 
धाकधूक आहे आता उरी
कोण कुणाचा हात धरी... 

पूर्वी होती काँगे्रस एक
नंतर आले अनेक
चला शोधू या, यातला
कोण आहे रे नेक...

कुणी उधळतो भंडारा
तर कोणी धुपारा
घालतो पंगती भोजनाच्या
काठोकाठ भरतो मदिरा...

सत्तेचा असतो सोस अति
हार न कोणी मानिती
आव्हान देतो प्रतिस्पर्धी
कोण कुणाच्या उरावरी...

एकमेका साह्य करु 
अवघे धरु सुपंथ,
असे कोण म्हणेल का 
आमचा योग्य पथ

लोकशाहीचा उत्सव आहे
पर्वणी आली पवित्र,
कुंभमेळ्याहुन आम्हा
वंद्य हो मतदान हे...

घे प्रतिज्ञा मतदारा
बजाव अपुल्या कर्तव्या
रोज नाही येत संधी
पात्र ज्यांच्या, दे सत्ता...

सुनील आपटे