बेळगाव : प्रतिनिधी
विश्वेश्वरय्यानगर येथील पीडब्ल्यूडीच्या क्वॉर्टर्समध्ये पोलिसांनी बुधवारी पहाटे छापा टाकून खेळण्यातल्या नोटा ‘बनावट’ समजून जप्त केल्या. शिवाय, एका युवकाला अटकही केली आहे.
महत्त्वाची बाब अशी की, या नोटा खेळण्यातल्या असून, त्यांच्यावर ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असा उल्लेख आहे आणि या नोटांचा वापर एका लघुपटामध्ये करण्यात येणार होता. तरीही पोलिसांनी आततायीपणाचा कळस गाठत पत्रकार परिषद घेऊन स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र, ‘बनावट नोटा आणि खेळण्यातल्या नोटा यामधला फरक पोलिसांना कळत नाही का’, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर वरिष्ठ अधिकारी निरुत्तर झाले.
याप्रकरणी अजित चिन्नाप्पा निडोणी (मूळ रा. विजापूर, सध्या रा. कंग्राळकर कॉलनी सदाशिवनगर) याला अटक झाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकामुळे जिल्ह्यात पोलिसांनी गस्त वाढविली आहे. मंगळवारी पोलिसांना बनावट नोटा येणार असल्याची माहिती मिळाली होती. यावरून विश्वेश्वरय्यानगर येथील पीडब्ल्यूडी क्वॉर्टर्समध्ये मध्यरात्री छापा टाकून नोटा ताब्यात घेऊन एकाला अटकही केली; पण बुधवारी सखोल चौकशी केली असता त्या खेळण्यातील नोटा निघाल्या. त्या नोटा गुलाबी व खाकी रंगाच्या आहेत. प्रथमदर्शनी त्या दोन हजार व पाचशेच्या नोटा वाटतात; पण त्या नोटांवर त्यांचे मूल्य शून्य शून्य शून्य असे आकड्यांत नोंद आहे. शिवाय, चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असा उल्लेख आहे.
रंगच फक्त सारखा
जप्त करण्यात आलेल्या नोटा खर्या नोटांसारख्या दिसतात. खाकी नोटांचे 153 बंडल आणि गुलाबी नोटांचे 292 बंडल, तसेच जुन्या हजार रुपये मूल्य असलेल्या नोटांसारख्या दिसणार्या नोटांचे 15 बंडल जप्त इतक्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या.
एकच खळबळ
नोटा बनावट असल्याचे पोलिसांनी आधी सांगितल्यामुळे शहरात मोठी खळबळ माजली होती. या नोटा मतदारांना वाटण्यासाठी आणल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. तर निवडणूक काळात झालेली ही मोठी कारवाई असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात होती. मात्र, चौकशीनंतर या नोटा मुलांच्या खेळण्यातील असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिस कारवाईच संशयाच्या भोवर्यात सापडली आहे.