Sat, Apr 20, 2019 10:20होमपेज › Belgaon › रेखीव नियोजनाचा साहित्य सोहळा

रेखीव नियोजनाचा साहित्य सोहळा

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 08 2018 10:07PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

तालुक्याच्या एका टोकावर असणार्‍या दुर्गम भागातील कुद्रेमानी गावात मागील 12 वर्षापासून साहित्य संमेलनाचा नंदादीप शांतपणे तेवत आहे. सीमाभागात होणार्‍या संमेलनात आपले वेगळेपण जपत त्यांची संथ पण दमदारपणे वाटचाल सुरू आहे. याचे प्रत्यंतर रविवारी पार  पडलेल्या तपपूर्ती संमेलनात दिसून आले. 

संमेलनाला स्थानिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. साहित्यिक उपक्रम दर्जेदार झाले. नामवंत वक्त्यांसह स्थानिकांनाही पुरेसे प्रतिनिधीत्व देण्यात आले. त्याचबरोबर गावातील गुणवंत व्यक्ती आणि माजी सैनिकांचा सत्कार सोहळा पार पडला. यातून स्थानिक मातीचा गंध संमेलनाच्या माध्यमातून घुमून गेला. 

संमेलने ही एक दिवसाची जत्रा अथवा उरूस ठरू नयेत, अशी भूमिका साहित्य रसिकांकडून सातत्याने घेण्यात येते. वेगवेगळ्या व्यासपीठावर ही मागणी नेटाने मांडण्यात येते. परंतु, याचे अनुकरण अपवाद वगळता कोणत्याही साहित्य संमेलनाकडून केले जात नाही. मात्र कुद्रेमानी संमेलनाने सातत्य जपले आहे. संमेलनाबरोबर वाचनालय चालविण्यात येते. साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात. यामुळे साहित्याकडे आस्थने पाहणार्‍या कार्यकर्त्यांची फळी तयार झाली असून त्यांच्या माध्यमातून कामाचे नियोजन होते. हे संमेलनात प्रकर्षणाने जाणवून आले. 

संमेलनाध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सीमाभागात भरणार्‍या संमेलानांची तोंड भरून प्रशंसा केली. कोणत्याही शासकीय मदतीविना पार पडणारी ही संमेलने खर्‍या अर्थाने साहित्य वाचविण्याचे काम करत आहेत. ही संमेलने मराठी साहित्य मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहण्याची गरज असल्याचे सांगितले. 

त्यांनी भाषणात वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यात साहित्य संमेलने उपयुक्त असून साहित्य निर्मितीची केंद्रे ग्रामीण भागाकडे वळण्याचे सांगितले. ग्रामीण भागातील वाचक पुस्तके वाचण्यासाठी आणि विचार ऐकण्यासाठी भुकेला असून त्याचे संवर्धन होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. 

कविसंमेलन म्हणजे कुद्रेमानी संमेलन हे असे अनोखे समीकरण मागील काही वर्षापासून निर्माण झाले आहे. याठिकाणी येणारा रसिक कवितेवर प्रेम करणारा असतो. यावर्षीही कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन महाराष्ट्रातील कविंच्या सोबतीला तीन स्थानिक कवी उपस्थित होते.  

प्रा. नंदा पाटील यांच्या प्रबोधनामुळे इतिहास समजून घेणे सुलभ झाले. कथाकथनातून रसिकांची करमणूक झाली. स्थानिक कवी अमृत पाटील यांच्या भविष्य शोधताना या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.