होमपेज › Belgaon › पेट्रोल-डिझेल, वीज दरवाढ होणार आजपासून लागू

पेट्रोल-डिझेल, वीज दरवाढ होणार आजपासून लागू

Published On: Jul 14 2018 12:54AM | Last Updated: Jul 13 2018 9:55PMबेळगाव : प्रतिनिधी

शेतकर्‍यांचे 2 लाखापर्यंतचे कर्जमाफी  जाहीर करूनही  शेतकरीवर्गात असंतोष धुमसत राहिल्याने चालू कर्जही माफ करण्याची घोषणा  राज्य सरकारडून करण्यात आली. यामुळे शेतकर्‍यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला आहे. मात्र, कर्जमाफीमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक बोजा पेलण्यासाठी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी वीज आणि पेट्रोल-डिझेलवरील कर वाढवला आहे. ही करवाढ शनिवार 14 जुलैपासून लागू होत आहे. 

नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर गुरुवारी प्रतिक्रीया दिल्यानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यानी कर, सेस वाढीसंदर्भातील मसुदा दोन्ही सभागृहासमोर मांडला. या मसुद्याला शुक्रवारी अनुमोदन देण्यात आले असून  त्यामुळे आता शनिवारपासून वीज, तेल व मद्य यांवरील कर  वाढणार आहे. मोटार वाहनावरील करात मात्र 1 ऑगस्टपासून वाढ करण्यात येणार आहे. काँग्रेस विधीमंडळाचे नेते माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांसह काँग्रेस?निजद आमदारांनी पेट्रोल व डिझेलवरील अतिरिक्त कर वाढविण्यात येऊ  नये, अशी आग्रही मागणी केली होती. करवाढीबरोबर मुख्यमंत्री काही पर्याय जाहीर करतील, अशी आशा होती. मात्र या आशेवर विरजण पडले.

थकीत कर्जाबरोबर चालू कर्जही माफ करण्यासाठी ‘ऋणमुक्त शेतकरी’ ची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला देण्यात येणार्‍या 7 किलोपैकी 5 किलो तांदूळ देण्यात येईल, असे अर्थसंकल्प मांडताना म्हटले होते. मात्र याबाबत कार्यवाही झालेली नाही.  माल वाहतुकीचा खर्च वाढणार असल्याने  खाद्यपदार्थ, भाजीपाला,  दूध यांचे दर वाढणार आहेत. त्याचबरोबर बस, टॅक्सी यांचा प्रवासदरही वाढणार आहे. सेसचा दर 19 टक्क्यावरून 21 टक्के करण्यात आला आला आहे.

कर्जमाफीतून काय साधले?

सहकारी बँकामधून चालू खात्यावरीर रु.1 लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्यात आले आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर रु. 10, 700 कोटींचा अतिरीक्त भार पडणार आहे.2017 च्या डिसेंबर 31 पर्यंत राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांमधून बाकी असलेले रु.2 लाखापर्यंत माफ करण्याची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची घोर निराशा 

शाळा?महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी सरकारने मनावर घेतलेली नाही. राज्यात विद्यार्थ्यांची संख्या 18 लाख आहे. विद्यार्थ्यांना आता पैसे देऊनच पास घ्याला लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली आहे.

मद्यपींनाही झळ बसणार 

सेस वाढीची झळ मद्यपीनाही बसणार आहे.  एखादा मद्यपी महिन्याला 3 हजार रु.चे मद्य घेत असल्यास सध्या असणार्‍या अबकारी शुल्कात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली असल्याने मद्यपींचा महिन्याचा खर्चही वाढणार आहे. 

प्रत्येक कुटुंबाचा दरमहा आर्थिक बोजा

सामान्य घरांचे वीजेचे बिल 500 रु.आल्यास कररुपाने अतिरिक्त 15 रु.भरावे लागणार आहेत.  कारण घरगुती वापराच्या विजेला कर 3 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. दुचाकी, चारचाकी वापरणार्‍यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास 50 लिटर पेट्रोलचा वापर केल्यास सेसचे प्रमाण, 30 टक्क्यावरून  32 टक्क्यावर वाढविण्यात आला असल्याने  प्रति लिटरला रु.1.14  वाहनधारकाला जादा मोजावे लागणार आहेत. तेल कंपन्यांकडून पेट्रोलची दरवाढ वारंवार करण्यात येत असतेच. आता सेसच्या वाढीमुळे वाहनाधारकांना वाहन वापरणे हे अधिकच खर्चाचे ठरणार आहे.