Wed, Mar 27, 2019 04:15होमपेज › Belgaon › पेट्रोल पंपाला आग 

पेट्रोल पंपाला आग 

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 12:17AMबेळगाव : प्रतिनिधी

अंबा भुवनपासून जवळच, मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपाला सोमवारी अचानक आग लागली. त्यात जीवितहानी झाली नाही, मात्र पंपाचे बरेच नुकसान झाले आहे. कामगारांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. मात्र, आगीची कल्पना अग्‍निशामक दलाला देण्यात आलेली नाही. पोलिस स्थानकातही आगीची नोंद नाही.सुधीर वंटमुरी यांच्या मालकीच्या अशोक पंपावर ही घटना घडली. पेट्रोल भरण्याचे काम सुरू असतानाच अचानक पंपातून धूर येऊ लागला. त्यामुळे कर्मचार्‍यांची धावपळ माजली. तोपर्यंत आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. इतक्यात कामगारांनी पंपावर असलेल्या अग्निशामक सिलिंडरचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खासगी टँकरनेही पाणी मागवण्यात आली. टँकर आल्यानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली.

आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज आहे. मात्र, याबाबत पोलिस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आलेली नाही. तसेच अग्‍निशामक दलालाही बोलावण्यात आले नव्हते.  त्यामागचे कारण स्पष्ट नाही. पंपापासून अग्‍निशामक केंद्र दोन कि.मी. अंतरावर आहे. तरीही खासगी टँकर मागवण्यात आले. याबाबत अग्‍निशमन अधिकार व्ही. एस. टक्केकर यांच्यासी संपर्क साधला असता ते म्हणाले, सामान्यपणे आग लागताच आम्हाला पाचारण केले जाते. पण पंपचालकांनी आम्हाला बोलावले नाही. कारण त्यांनाच माहिती असेल. पण सामान्यपणे आम्ही आग विझवण्यासाठी जातो तेव्हा परत आल्यानंतर आम्हाला एक अहवाल तयार करावा लागतो. त्यात घटनास्थळाबाबत माहिती द्यावी लागले. हा पंप रस्त्याला अगदी लागून आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलावले नसावे का, हा प्रश्न आहे.