होमपेज › Belgaon › परराज्यातील बटाटा एपीएमसीत

परराज्यातील बटाटा एपीएमसीत

Published On: Dec 02 2017 12:40AM | Last Updated: Dec 01 2017 10:41PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

स्थानिक शेतकरी व रयत संघटनेने स्थानिक बटाट्याला भाव मिळावा, यासाठी परराज्यातील बटाट्याच्या विक्रीला विरोध दर्शविला होता. यामुळे त्या बटाट्याची विक्री बंद करण्यात आली होती; मात्र बटाट्याची मागणी वाढून आवक घटल्याने व्यापार्‍यांसमोर ग्राहक टिकविण्याचा प्रश्‍न उभा आहे. व्यापारी संघटनेने एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव यांच्याशी चर्चा करून परराज्यातील बटाटा विक्रीसाठी परवानगी मिळविली. 

एपीएमसी बाजारपेठेत गेल्या महिनाभरापासून आग्रा, इंदूर येथून आयातीला विरोध दर्शवून शेतकरी संघटनांनी स्थानिक बटाट्याच्या विक्रीला प्राधान्य देण्याची मागणी केली होती. परराज्यातील बटाट्यामुळे स्थानिक बटाट्याला भाव मिळत नाही.शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उत्पादन खर्चही निघत नाही, असा आरोप करून शेतकरी संघटनांनी व्यापार्‍यांच्या धोरणाला विरोध करून एपीएमसी सचिवांना निवेदन दिले होते. यावरून आयात बटाटा विक्रीवर निर्बंध लादले. स्थानिक बटाट्याची आवक अत्यल्प होत आहे. एपीएमसीच्या बुधवार व शनिवारच्या बाजारात प्रत्येकी 5 हजार बटाटा पोत्यांची मागणी असते. सध्या केवळ 2 हजार पोत्यांची आवक होत आहे. व्यापार्‍यांना  मागणीनुसार बटाटा पुरविणे अशक्य ठरत आहे. उलाढाल होत नसल्याने एपीएमसीच्या सेसवरही परिणाम होत आहे. यामुळे व्यापारी संघटना व एपीएमसी व्यापारी प्रतिनिधींनी समस्या सचिव गुरुप्रसाद व एपीएमसी अध्यक्ष जाधव यांच्यासमोर मांडल्या. 

गोव्याला नववर्ष व पर्यटकांची गर्दी वाढल्याने बटाट्याची मागणी वाढली आहे. गोव्याचे ग्राहक कोल्हापूर, हुबळी, सांगली बाजारपठेतून बटाट्याची आयात करत आहेत. याचा परिणाम आपल्या व्यवसायावर होत असल्याची तक्रार व्यापार्‍यांनी केली. अध्यक्ष जाधव यांनी एपीएमसी आवाराबाहेर थांबलेल्या इंदूर, आग्रा बटाट्याच्या गाड्यांना एपीएमसीत प्रवेश देण्यास परवानगी देऊन विक्रीला संमती दिली. 

एपीएमसी सदस्य तानाजी पाटील, महेश कुगजी, मनोज मत्तीकोप, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजू पाटील, एम. बी. मुंगारी, दीपक होनगेकर, संभाजी होनगेकर, अरविंद कडूकर, टी. एस. पाटील, महेश देसूरकर, तुषार ठुमरी, गजानन पाटील, नूर कोतवाल, रमेश हुक्केरी आदी व्यापारी उपस्थित होते.