होमपेज › Belgaon › फ्लायओव्हर रोखणार कोंडी

फ्लायओव्हर रोखणार कोंडी

Published On: Jun 21 2018 1:26AM | Last Updated: Jun 20 2018 11:00PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील सर्वाधिक वाहतुकीची वर्दळ असणार्‍या गोगटे चौकात फ्लायओव्हर उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहे. सदर प्रस्तावाची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी शहरवासियांतून होत आहे.

प्रस्तावित फ्लायओव्हरचा आराखडा भरतेश अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे.  आराखड्यानुसार फ्लायओव्हरची उभारणी केल्यास वाहतूक समस्या सुरळीत होण्यास मदत होण्याची  शक्यता आहे. यातून शहरातील  वाहतुकीला वळण लावणे शक्य होणार आहे. हाच आराखडा खा. सुरेश अंगडी व आ. अनिल बेनके यांनी संबंधित खात्यासमोर ठेवला आहे. 

शहरात झपाट्याने विकासकामे सुरू असताना समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजनांची अत्यावश्यकता आहे. शहरातील मुख्य भागातून जाणारा रस्ता म्हणून खानापूर रोड ओळखला जातो. कॅम्प येथून पणजी राष्ट्रीय महामार्गाला सुरुवात होते. येथून दररोज धावणार्‍या वाहनांची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, अपघातही घडत असतात. 

या प्रकल्पासाठी खा. अंगडी यांनी पुढाकार घेतला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एच. डी. रेवण्णा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत  समस्यांबाबत प्रस्ताव ठेवण्याची सूचना केली होती. गोगटे ब्रीजचे काम सुरू आहे. नंतर तिसरे रेल्वे गेट येथे उभारण्यात येणार्‍या ब्रीजच्या कामाची सुरूवात होणार आहे. गोगटे चौकात वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार आहे. त्यावर उपाययोजना म्हणून फ्लायओव्हर प्रस्ताव आहे. काँग्रेस रस्त्याने येणारी व रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहने थेट जाऊ शकतात. कॅम्पकडे जाणार्‍या वाहनांना वाहतूक कोंडीचा अडथळा येणार नाही.  गोवावेसच्या बाजूने येणारी वाहने फ्लायओव्हरच्या माध्यमातून थेट कॅम्पकडे जाऊ शकतात. काँग्रेस रोडकडे येण्यासाठी दुसरा जोडरस्ता प्रस्तावित आहे. कॅम्प परिसरातून येणारी वाहने गोवावेस रस्त्याकडे जाणे सुलभ ठरणार आहे. फ्लायओव्हरची एकूण लांबी 427 मी. इतकी असेल. 

कॅम्प परिसरातून जाणार्‍या वाहनापैकी 60 टक्के वाहने गोवावेसकडे, 30 टक्के काँग्रेस रोड तर 10 टक्के वाहने रेल्वे स्थानकाकडे धावत असतात. भरतेश अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी याबाबतचा आराखडा सादर केला आहे. हा प्रस्ताव खा. अंगडी व आ. बेनके यांनी मांडला आहे. आराखडा तयार करणार्‍यांमध्ये अभिषेक मालाजी, अतुल बेळगुंदकर, शुभम मालाजी, नारायण स्वामी हट्टी, जुनैद सावनूर व शिक्षक राजू मन्नोळकर यांचा समावेश आहे.