Thu, Jul 18, 2019 14:54होमपेज › Belgaon › ‘शशी’मुळे  आता विकासाचा ‘सूर्य’ उगवणार का?

‘शशी’मुळे  आता विकासाचा ‘सूर्य’ उगवणार का?

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 22 2018 12:16AMबेळगाव : शशी बेळगुंदकर

मनपाचे आता कायमस्वरूपी आयुक्‍त म्हणून शशिधर कुरेर यांची सरकारने नियुक्‍ती केली आहे. यामुळे शहरातील विकासाला व स्मार्ट सिटी योजनेच्या कामांना चालना मिळणार का, असा प्रश्‍न नगरसेवक व नागरिकांकडून केला जात आहे. जूनपासून पावसाळ्याचा प्रारंभ झाला असून शहरामध्ये भूमिगत विद्युत केबल घालण्याच्या कामामुळे शहर व उपनगरातील रस्त्यांमध्ये हेस्कॉमने खड्डेच खड्डे निर्माण केले आहेत.

हेस्कॉमने भूमिगत  केबल घालण्याच्या कामासाठी रस्त्यामध्ये खड्डे खोदले. काम आटोपल्यानंतर बुजविले नसल्यामुळे वाहनचालकांची व नागरिकांची गैरसोय होत आहे. यासाठी मनपाने प्रथम शहरातील खड्डे बुजवा मोहीम राबविली पाहिजे. त्याशिवाय  केबल घालताना अनेक ठिकाणी जलवाहिन्या व ड्रेनेज लाईन फोडण्यात आल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यापूर्वीच खोदलेल्या चरी बुजविल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी जलवाहिन्यांची व ड्रेनेज लाईन्स्ची प्राधान्याने दुरुस्ती करून घेण्याची मागणी होत आहे.

कुरेर यांनी यापूर्वी मनपामध्ये सेवा बजावली असून व स्मार्ट सिटी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा चार्जही त्यांच्याकडेच होता. यामुळे त्यांना स्मार्ट सिटी योजनेच्या कामांची कल्पना आहे.  योजनेतील अनेक कामे अद्यापही रेंगाळलेलीच आहेत. केंद्र-राज्य सरकारकडून आलेला 400 कोटींचा निधी वापराविना पडून आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असूनसुध्दा स्मार्ट सिटी योजनेची म्हणावी तशी व नजरेत भरणारी कामे सुरू झालेली नाहीत. त्या कामांना चालना देण्याचे काम  कुरेर यांनी केले पाहिजे. स्मार्ट सिटी योजनेतून काही रस्त्यांचा विकास करण्यासाठी निवडणुकीपूर्वी 93 कोटीचा निधी मंजूर केला आहे. परंतु कामाची सुरुवातही दिसत नाही. आयुक्‍तांना मनपाच्या दैनंदिन कामकाजाबरोबरच स्मार्ट सिटी योजनांच्या विकासकामांना चालना देण्याची आवश्यकता आहे.

शहरासाठी जागतिक बँकेने 24 तास पाणी योजनेसाठी एकूण 630 कोटीची योजना मंजूर केलेली आहे. याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी मलेशिया कंपनीची निविदा कर्नाटक शहर मूलभूत विकास व अर्थ महामंडळाने मंजूर केली होती. परंतु त्या कंपनीने ऐनवेळी घेतलेले कंत्राट मागे घेतल्याने 24 तास पाणी योजनेसाठी पुन्हा जागतिक पातळीवरच्या निविदा काढण्याची वेळ महामंडळावर आली. त्यासाठी दुसर्‍यांदा निविदा काढण्यात आली. परंतु निविदा घेण्यासाठी कोणतीच कंपनी पुढे आलेली नाही. पुन्हा तिसर्‍यांदा निविदा काढण्याची वेळ आली आहे.

शहरातील मनपाच्यावतीने हाती घेण्यात येणार्‍या या विकास कामांना चालना देण्यासाठी कुरेर यांना प्रथम मनपाची घरपट्टी, भूभाडे,  मनपाच्या गाळ्यांचे भाडे, जाहिरात फलकांचे भाडे वसूल करण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. मनपाच्या खजिन्यात खडखडाट असल्याचे लेखापाल अधिकारी रामाप्पा हट्टी यांनीच जाहीर केले आहे. यामुळे मनपाचा खजिना रिकामा असताना कारभार कसा हाताळणार, असा प्रश्‍न आयुक्‍तांसमोर आहे. आयुक्‍तांसमोर चक्रव्यूहासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.