Sun, May 19, 2019 22:45होमपेज › Belgaon › ‘सीमावासीयांची नाळ महाराष्ट्राशी जोडलेली’

‘सीमावासीयांची नाळ महाराष्ट्राशी जोडलेली’

Published On: Jan 18 2018 12:10PM | Last Updated: Jan 18 2018 11:56AM

बुकमार्क करा
खानापूर : प्रतिनिधी

सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी बलिदान दिलेल्यांचा एकच ध्यास होता. तो म्हणजे मराठीबहुल सीमाभाग महाराष्ट्रात सामील करणे. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून समितीच्या प्रत्येक लढ्यात सर्वांनी तळमळीने कार्य करावे. महाराष्ट्राच्या मातीशी सीमावासीयांची नाळ जोडली असल्याने अखेरच्या श्‍वासापर्यंत मायमराठीच्या राज्यात जाण्यासाठी अविरतपणे लढा सुरूच ठेवू, असे ठाम प्रतिपादन तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आ. दिगंबर पाटील यांनी केले.

तालुका म. ए. समिती आणि  मराठी भाषिक जनतेच्यावतीने हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुंडलिक चव्हाण आणि दिगंबर पाटील यांनी नागाप्पा होसुरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. 

माजी आ. पाटील म्हणाले, 62 वर्षांपासून धगधगणार्‍या सीमाप्रश्‍नाच्या अग्निकुंडात शेकडो जणांनी हौतात्म्य पत्करले. हुतात्म्यांचे  बलिदान सत्कारणी लागण्यासाठी सर्वांनी सीमाभागासह महाराष्ट्र राज्याचे स्वप्न साकार होईपर्यंत अभेद्य एकजूट राखावी.

विलास बेळगावकर यांनी सीमालढ्याची ताकद वाढविण्यासाठी मराठी भाषिकांचे संघटन काळाची गरज असल्याचे सांगितले. अ‍ॅड. अरुण सरदेसाई म्हणाले, कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात महाजन अहवालावरच विशेष भर दिला आहे. मुळात केंद्रानेच महाजन अहवाल फेटाळला असल्यामुळे कर्नाटकची बाजू कमकुवत आहे. 

भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील म्हणाले, सीमालढा जिवंत ठेवण्याचे कार्य सर्वसामान्य जनतेने केले आहे. जनतेचे पाठबळच या लढ्याची खरी ताकद आहे. तत्त्व आणि नीतिमूल्यांना धरून सुरू असलेल्या या लढ्यात सीमावासीयांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही.

कुप्पटगिरी ग्रामस्थांच्यावतीने संभाजी पाटील व नारायण पाटील यांनी अभिवादन केले. आबासाहेब दळवी, जि. पं. सदस्य जयराम देसाई, ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत यांची भाषणे झाली. यशवंत बिर्जे, नारायण कापोलकर, प्रकाश चव्हाण, वसंत नावलकर आदींनी श्रद्धांजली वाहिली.