बेळगाव : प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतकर्यांचे थकित बिल साखर कारखानदारांनी किमान एफआरपीनुसार त्वरित अदा करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी दिला.जिल्ह्यातील साखर कारखाना प्रतिनिधींची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.शेतकर्यांच्या थकित ऊस बिलाबाबत 6 जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कारखानदारांना थकित बिले देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही कारखान्यांनी बिले अदा केली आहेत. अद्याप काही कारखान्यांनी बिले दिलेली नाहीत. अशा कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकार्यांनी बैठकीत दिला.
शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारखानदारांनी कोणत्याही परिस्थितीत बिले देणे आवश्यक आहेत.अन्यथा अशा कारखानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
थकबाकी असणार्या 17 कारखान्यांपैकी रेणुका शुगर्स कोकटनूर, दूधगंगा कृष्णा साखर कारखाना नणदी, सोमेश्वर साखर कारखाना, भाग्यलक्ष्मी (लैला) शुगर्स खानापूर, शिवशक्ती शुगर्स रायबाग, रायबाग शुगर्स (रेणुका), गोकाक शुगर्स (कोळवी) या कारखान्यांनी थकबाकी अदा केली आहे.कारखाना प्रतिनिधींनी शेतकर्यांना थकित रक्कम देण्यात येत असल्याची माहिती दिली. हालसिद्धनाथ प्रतिनिधींनी आठ दिवसात बिले देणार असल्याची ग्वाही दिली. अन्य कारखान्यांच्या प्रतिनिधींनी आठ ते पंधरा दिवसात बिले देण्याचे आश्वासन दिले. जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, कृषी खात्याचे उपसंचालक मोकाशी, आहार आणि नागरी सुविधा पुरवठा खात्याच्या उपसंचालिका सय्यद आफ्रिनबानू बळ्ळारी उपस्थिती होत्या.