Tue, Jun 25, 2019 22:11होमपेज › Belgaon › बेळगावला लाभणार पासपोर्ट केंद्राचे ‘प्रेम’

बेळगावला लाभणार पासपोर्ट केंद्राचे ‘प्रेम’

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 08 2018 8:56PMबेळगाव : प्रतिनिधी

वर्षभरापासून रखडलेल्या येथील पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन 14 फेब्रुवारीला होणार आहे. रेल्वे स्थानकाजवळील डाक कार्यालयात व्हॅलेंटाईन डेला उद्घाटन होणार असून यामुळे ‘बेळगावला पासपोर्ट सेवा केंद्राचे प्रेम’ लाभण्याचा योग जुळून आला आहे. 

विदेश मंत्रालय, क्षेत्रीय पासपोर्ट सेवा कार्यालय बंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. यासंबंधी एका पत्रकाद्वारे उद्घाटनाची माहिती प्रसिद्ध केली आहे. मात्र, उद्घाटक व इतर मान्यवराची यादी लवकच जाहीर करण्यात येणार असल्याचे डाकघर कार्यालयातून सांगण्यात आले. 

व्हॅलेंटाईन डेला प्रेमाचा दिवस म्हणून ओळखले जाते. आई, वडील, प्रियकर, प्रेयसी कोणावरही प्रेम असू शकते. वर्षभरापासून दुर्लक्षित पासपोर्ट कार्यालयाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाल्याने बेळगावकरांतूनही आनंद व्यक्त केला जात आहे. दोन दिवसापूर्वी खा. सुरेश अंगडी यांनी 13 फेब्रुवारीला उद्घाटन करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. एक दिवस उशिरा का होईना उद्घाटन होत असल्याने बेळगावकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे. 

बेळगावात पासपोर्ट सेवा केंद्र व्हावे, ही प्रलंबित मागणी होती. वर्षभरापूर्वी मान्यता मिळाली होती. दोन महिन्यात उद्घाटन होणे आवश्यक असताना वर्षभराचा कालावधी होऊनही मुहूर्त मिळत नव्हता. यामुळे बेळगावकरांतून रोष व्यक्त करण्यात येत होता. खा. अंगडींचे दिल्लीत कोण ऐकत नाही का, असेही बोलले जात होते. 

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी 14 जानेवारीला झालेल्या कडोली मराठी साहित्य संमेलनात दोन महिन्यात पोसपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. उद्घाटनाला येणार असल्याची इच्छाही  त्यांनी व्यक्त केली होती. सुरुवातीला रोज 50 अर्जं स्वीकारले जाणार आहेत.