होमपेज › Belgaon › परशुराम भांड्याच्या दुकानातून रिअल इस्टेटमध्ये

परशुराम भांड्याच्या दुकानातून रिअल इस्टेटमध्ये

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 23 2018 12:02AMबंगळूर ः प्रतिनिधी

भांड्यांच्या दुकानात कामगार म्हणून काम करणारा परशुराम वाघमारे नंतर रिअल इस्टेट व्यवसायात शिरला होता...  चौडेश्‍वरी मंदिरात तो सायंकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत रहायचा... त्याच्यासोबत काही मित्र होते. महिला, मुलींना कुणी छेडले तर ते त्याला आवडत नव्हते...

परशुरामच्या मित्रांनी विशेष तपास पथकाला दिलेली ही माहिती. विजापूर जिल्ह्यातील सिंदगी गावचा रहिवाशी असलेल्या परशुरामला 11 जून रोजी अटक झाली. त्यानंतर ग्रामस्थ अजूनही तणावाखाली आहेत. जिल्ह्यात कुठेही गेल्यानंतर सिंदगीच्या माणसाला याबद्दलच आता विचारले जात असल्याची खंत त्यांना आहे.

पुरोगामी विचारवंत पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी सिंदगी (जि. विजापूर) येथील परशुराम वाघमारे याला अटक झाल्यानंतर गावामध्ये याविषयी कुणीच बोलण्यास तयार नाहीत. विशेष तपास पथकाच्या चौकशीत परशुरामनेच गौरी यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गावात कुणी नवा चेहरा दिसला की त्याच्याकडे ग्रामस्थ बोलण्यासही तयार होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी काही पत्रकार सिंदगी येथे गेले होते. त्यावेळी त्यांना हा प्रकार अनुभवावयास मिळाला. काही दिवसांपूर्वी परशुरामचा मित्र सुनील असगर याला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सुनीलच्या घरी गेल्यानंतर त्याच्या आईने तो गावात नाही, पंढरपूरला गेल्याचे सांगितले. त्याच्या वडिलांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी पोलिस उपअधीक्षकांनी सुनीलला क्‍लीनचिट दिली असून स्वत: ते सुनीलला घरी सोडावयास आले होते, असे सांगितले. 

आतापर्यंत सिंदगीतील स्थिती सामान्य होती. जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून त्यात बदल झाला आहे.  गौरी लंकेश हत्येचे सिंदगी कनेक्शन उघड झाल्यानंतर तेथील ग्रामस्थांत घबराट आहे. सुनीलचे कुटुंबीय परीट व्यवसाय करतात. याआधी ते टेलरिंग व्यवसायात होते. त्यांचे कल्याणनगरात उस्मानिया मशिदीच्या मागे छोटेसे दुकान आहे. विविध जाती, धर्मातील ग्राहक त्यांच्याकडे आहेत. त्या ठिकाणी धार्मिक सलोख्याने लोक राहतात. अशा परिस्थितीत सुनीलचा हात पाकिस्तानचा ध्वज फडकवण्यात कसा असू शकतो असा प्रश्‍न एका कामगाराने केला.

प्रशिक्षण अमोल काळेकडून

‘मला काही करू नका, तुम्ही दाखविलेल्या फोटोतील व्यक्‍तीला मी ओळखतो. त्याच्यासह तिघांनाही मी ओळखत असून अमोल काळेने मला पिस्तूल चालवायचे प्रशिक्षण दिले.’ अशी माहिती गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित परशुराम वाघमारे यांनी एसआयटीच्या चौकशीवेळी दिली. 11 जून रोजी अटक झाल्यापासून आतापर्यंत परशुराम हा अमोल काळे ऊर्फ भाईसाब, सुजीतकुमार ऊर्फ प्रवीण आणि मनोहर येडवे यांची ओळख नसल्याचे सांगत होता. मात्र, त्यांच्याशी संपर्क असल्याचे पुरावे परशुरामला दाखवून आणि कसून चौकशी केल्यानंतर त्याने चूक कबूल केली. के.टी. नवीनकुमार आणि अमित दिग्वेकर यांची ओळख नसल्याचे त्याने सांगितले आहे.

विजापुरातील एका संघटनेच्या कार्यात असताना ऑगस्ट 2017 मध्ये शिकारीपुरातील सुजीतकुमारने आपल्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर पुणे येथील अमोल काळेशी संपर्क झाला. सुजीतने संपर्क साधून ‘हिंदू धर्माच्या रक्षणासाठी एक कार्य तुझ्या हातून व्हायचे असल्याचे सांगितले. त्याकरिता गौरी लंकेश यांची हत्या करावी लागेल. विचार करून काय ते कळव’ असे सांगितले होते. त्यानंतर अमोल काळेने सिंदगी येथे येऊन हत्येच्या कटाची माहिती दिली. गौरी लंकेश यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर हत्येसाठी होकार दिल्याचे परशुरामने एसआयटी अधिकार्‍यांना सांगितले.

हत्येसाठी तयारी दर्शविल्यानंतर पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू झाली. पुणे आणि बेळगावातील सीमेवर शुटिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. अमोल काळेने प्रशिक्षण दिले. त्यावेळी त्याच्यासोबत सुजीतकुमार आणि मनोहर येडवेही होते. एसआयटी अधिकार्‍यांनी परशुरामला अटक करून अमोल काळेसमोर आणल्यानंतर सर्वकाही उघड झाल्याचे समजून डोके आपटू लागला. अधिकार्‍यांनी त्याची समजूत घालून त्याला संयम राखण्यास सांगितले.

हत्या करून गावी आल्यानंतर दोघांनी आपली भेट घेऊन 10  हजार रुपये दिले होते. ‘कुणाच्याही हाती लागू नको. कुणीही काहीही विचारले तर माहीत नाही, एवढेच उत्तर दे. तू आणि तुझ्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल.’ असे त्या दोघांनी सांगितले. पैसे देणारी व्यक्‍ती उंच होती. ती वकील असल्यासारखे वाटते. त्याच्यासोबत असणारी व्यक्‍ती त्याला ‘दादा’ म्हणत होती. ती व्यक्‍ती म्हणजेच ‘निहाल’ असल्याचे समजते. या प्रकरणात आणखी तिघांचा शोध घेतला जात असल्याचे एका एसआयटी अधिकार्‍याने सांगितले.

“जाती,धर्माच्या नावावर शांतता बिघडविणार्‍या संस्थांवर कठोर कारवाई करा. गौरी लंकेश हत्या प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास समाधानकारक आहे. या प्रकरणाच्या पूर्ण तपासासाठी सरकारचे सहकार्य असेल. कोणत्याही ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पोलिसप्रमुख, पोलिस उपायुक्‍त, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाईल.” -एच.डी.कुमारस्वामी, मुख्यमंत्री