Sun, Aug 18, 2019 14:23होमपेज › Belgaon › पार्किंगला शिस्त... वाहने लावण्याची समस्या

पार्किंगला शिस्त... वाहने लावण्याची समस्या

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 25 2018 10:20PMबेळगाव : प्रतिनिधी

वाहतुकीचे नियम मोडणे तसेच नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणार्‍यांवर रहदारी पोलिस विभागाने कारवाईला गती दिली आहे. याप्रमाणे शहरातील कॉलेज रोड व मुख्य बाजारपेठेतील पार्किंगला शिस्त लावण्यात येत आहे. मात्र, पार्किंगस्थळ उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना वाहने लावण्याची समस्या निर्माण होत आहे. 

वाहतूक पोलिसांनी बुधवारपासून कॉलेज रोडवर दोन्ही बाजूने लावण्यात आलेली वाहने हटविली. मात्र, वाहनधारकांसमोर पार्किंगचा प्रश्‍न उभे राहिला आहे. कॉलेज रोडवर नामांकित कंपन्यांच्या शोरुम, बँका, हॉटेल्स आहेत. यामुळे वाहनधारकांना रस्त्याच्या बाजूला वाहने लावावी लागतात. मात्र, वाहतूक पोलिसांकडून बुधवारी व गुरुवारी कॉलेज रोडवरील वाहने हटविण्यात आल्याने त्यांच्यातून नाराजीचा सूर उमटत होता. शहरात इतर ठिकाणीदेखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील वाहनतळांच्या प्रश्‍नाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. यामुळे पार्किंगला शिस्त, मात्र वाहने लावण्याची समस्या असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

स्मार्टसिटीत पार्किंगची समस्या फार मोठी आहे. नो पार्किंगमध्ये वाहने पार्क केलेल्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. मात्र, वाहनतळ नसल्याने वाहनधारकांना वाहने लावण्यासाठी अडचणी येत आहेत. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच आहे. यामुळे मुख्य रस्त्यावर तसेच बाजारपेठेत नेहमीच वाहतूक कोंडीचा प्रश्‍न उद्भवतो. शहरातील वाहनांच्या तुलनेत वाहनतळ कमी असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, शनिवार खूट परिसर तसेच कॉलेज रोडवर वाहनांची सतत वर्दळ असते. या भागात येणार्‍या वाहनांची संख्याही अधिक आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत वाहने पार्क करण्यासाठी कसरत करावी लागते. काही वाहनधारक  रस्त्यावरच आपली वाहने उभी करतात. यामुळे  पार्किंगची समस्या नित्याचीच बनली आहे. 

मनपाकडून शहरात नवी इमारत बांधकाम परवाना घेताना संबंधित ठेकेदार, मालकाने तळघराची जागा पार्किंगसाठी द्यावी लागते. मात्र, अनेक तळघरांत व्यापारी आस्थापने दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई करून ती जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.