Tue, Jun 18, 2019 22:55होमपेज › Belgaon › पालकांनो सावधान ! मुलांशी वाढवा संवाद

पालकांनो सावधान ! मुलांशी वाढवा संवाद

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 11:47PM

बुकमार्क करा

बेळगाव : शिवाजी शिंदे

काही दिवसांपूर्वी शहरातील एका नामांकित माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्रांना धमकावून 5 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. यामुळे कोवळ्या वयातील निरागसपणाला पडलेल्या गुन्हेगारी विळख्याचा भयावह चेहरा उघडकीस आला असून पालक हादरले आहेत.

उपरोक्त प्रकार हा निव्वळ पैशाच्या हव्यासातून घडला. चैनीसाठी हवा असणारा पैसा आपल्याच वर्गमित्रांना धमकावून उकळण्याचा प्रकार घडला. यातून कोवळ्या वयात घडणार्‍या संस्काराची चर्चा ऐरणीवर आली आहे. 

विद्यार्थीदशा हे संस्कार घडविण्याचे वय असते. या काळात होणारे संस्कार आयुष्याच्या शेवटपर्यंत सोबत करतात.  बालपण हा जीवनाचा पाया असतो.  त्या वयात मिळणार्‍या शिदोरीवर आयुष्याची इमारत उभी राहते. 

परंतु, मुलावर होणारे  संस्कार लुप्त होत चालले असून त्यांच्या जीवनात चैनीखोर वृत्ती बळावत आहे. सहज उपलब्ध होणारे पैसे, लहानपणापासून होणारे लाड, कष्टाच्या कामाचा अभाव, रोजच्या जीवनात समाजमाध्यमांचा सतत सुरू असणारा भडीमार, हरवत चाललेला संवाद यातून चंगळवाद वाढत आहे.

ही धोक्याची घंटा आहे. पालकांनी सजग होण्याची गरज आहे. आपल्या मुलांना रोजच्या खर्चासाठी देण्यात येणारा पॉकेटमनी कोणत्या कामासाठी खर्च केला जातो, त्याचा मित्रपरिवार कोणता आहे, शाळेच्या वेळेत तो वर्गात असतो का, शिक्षक व मित्राशी त्याची वागणूक कशी आहे, शाळेनंतर तो कुठे असतो, मोबाईलच्या माध्यमातून तो कोणाशी चॅटिंग करत असतो, मित्रांच्या सवयी कोणत्या आहेत यावर नजर ठेवावी लागणार आहे.

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम प्रत्येकावर होत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा भडिमार होत आहे. यातून विद्यार्थीदेखील गुरफटले जात असून त्यांच्यात गुन्हेगारीवृती भिनत चालली आहे. यासाठी संवाद वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. 21 व्या शतकात मुलांचे संगोपन करतांना पालकासमोर नवी आव्हाने उभी ठाकत आहे. बदलते पालकत्व जाणून घेण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.