Tue, Jun 18, 2019 22:19होमपेज › Belgaon › अनमोड जंगलात परशुरामची चौकशी

अनमोड जंगलात परशुरामची चौकशी

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 22 2018 12:25AMबेळगाव/ खानापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडणार्‍या परशुराम वाघमारेची  गुरुवारी बेळगाव-गोवा सीमेवरील अनमोड जंगलात नेऊन चौकशी करण्यात आली. त्याने बेळगाव परिसरात शस्त्रप्रशिक्षण नेमके  कुठे घेतले, त्याला कुणी कुणी मदत केली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. तथापि, ठोस माहिती हाती लागू शकली नाही, असे सूत्रांकडून समजते.

बंगळूरचे विशेष तपास पथक (एसआयटी) ही चौकशी करत असून, पथकातील काही अधिकारी बुधवारी सायंकाळी बेळगावला आले होते. गुरुवारी चौकशी केल्यानंतर रात्री ते बंगळूरला रवाना झाल्याची माहिती मिळाली. गौरी यांच्यावर गोळ्या झाडल्याची कबुली विजापूर जिल्ह्यातील सिंदगीचा रहिवाशी असलेल्या परशुराम वाघमारेने गेल्या आठवड्यात दिली होती. त्याने या हत्येसाठी बेळगाव परिसरात तब्बल 15 दिवस प्रशिक्षण घेतले होते. गौरी हत्या प्रकरणाचा सूत्रधार अमोल काळेने त्याला एअरगनच्या साहाय्याने प्रशिक्षण दिले होते. सुमारे 500 फैरी झाडण्याचा सराव त्याने केला होता, अशी कबुली परशुरामने दिलेली आहे.

तीन वाहनांचा ताफा

गुरुवारी खानापूर-भीमगड अभयारण्यातील पाली आणि अनमोड, तिनईघाट, केसलरॉक परिसरात एसआयटीने तपास केला. पहाटे  6 वा. च्या सुमारास एसआयटीचे पथक तीन वाहनांसह भीमगड अभयारण्याच्या शेडेगाळीजवळील पहिल्या गेटकडे आले होते. त्यांनी गेटवरील वन खात्याच्या कर्मचार्‍यांकडे अनमोड, पाली, केसलरॉक परिसराविषयी  विचारणा केली.  त्यांनी पाली  गेटजवळ परशुरामला गाडीतून खाली उतरवून  चौकशी केली. त्यानंतर अनमोड आणि केसलरॉक जंगलात तपास दौरा केला. दुपारी 2 च्या सुमारास एसआटी पथक बेळगावकडे रवाना झालेे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

किती जणांची चौकशी?

एसआयटीने बेळगाव परिसरातील काही लोकांची चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परशुराम वाघमारेचे विजापूर जिल्हा श्रीराम सेनेशी घनिष्ट संबंध होते. त्या संबंधांमधून काही हिंदुत्ववादी संघटनांच्या सदस्यांकडे विचारणा करण्यात आली, अशी माहितीही सूत्रांनी दिली. तथापि, किती लोकांकडे चौकशी करण्यात आली, ही माहिती उपलब्ध झाली नाही. गौरी हत्या प्रकरणातील संशयितांनी आपल्याला एसआयटीकडून मारहाण होत असल्याची तक्रार बंगळूर न्यायालयाकडे केली होती.

परशुरामला निद्रानाशाचा विकार

एसआयटी अधिकार्‍यांनी परशुराम वाघमारेला जिल्हा रुग्णालयात बुधवारी सायं. 5.40 वा. दाखल करून वैद्यकीय तपासणी करवून घेतली. डॉ. किरणकुमार गुडे यांनी त्याची तपासणी केली. त्यानुसार त्याला डोकेदुखी, निद्रानाश, अ‍ॅसिडीटीचा त्रास आहे. बंगळूर येथील राजराजेश्वरीनगर पोलिस स्थानकाचे निरीक्षक आणि एसआयटीमधील अधिकारी कृष्णमूर्ती एस. यांच्या देखरेखीखाली  परशुरामला बेळगावला आणण्यात आले होते. 

वास्तव्य पिरनवाडी आयबीमध्ये

परशुरामसह एसआयटी पथकातील अधिकारी बुधवारी रात्री व्हीटीयू परिसरातील एका सरकारी विश्रामधामात वास्तव्याला होते. पिरनवाडी परिसरात वनखात्याचे विश्रामधाम असून, येथेच त्यांनी विश्रांती घेतली असण्याची शक्यता आहे.

जांबोटी परिसरातही तपास 

अनमोड जंगलात जाण्यापूर्वी एसआयटीने परशुरामला घेऊन जांबोटी भागातही तपास केला. परशुरामने शस्त्रप्रशिक्षण घेतलेल्या ठिकाणांचा शोध घेतला  जात आहे. गुरुवारी रात्री एसआयटी हुबळीकडे रवाना झाले असल्याचे समजते.

स्थानिक पोलिस अनभिज्ञ

एसआयटी पथक परशुरामला घेऊन बेळगावात आलेले असले तरी त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधलेला नाही, अशी माहिती सूत्रांकडून समजते.