होमपेज › Belgaon › पेपर तपासणीत घोळ; सुधारित निकालाची मागणी  

पेपर तपासणीत घोळ; सुधारित निकालाची मागणी  

Published On: Jul 28 2018 1:32AM | Last Updated: Jul 27 2018 7:53PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्य सरकार शिक्षक भरतीसाठी पहिल्या टप्प्यात दहा हजार शिक्षकांची (6 वी ते 8 वी वर्गासाठी ) भरती करणार आहे. सीईटी झाली आहे. मात्र सीईटीची पेपर तपासणी चुकीची झाली आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.  सीईटी निकालाच्या विरोधात विद्यार्थी एकत्रित आले आहेत. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया ऱखडली आहे. 11 नोव्हेंबर 2017 रोजी सीईटी झाली होती. मात्र, निकाल घोषित करण्यास बराच विलंब लावला आहे. शिक्षण खात्याने की अ‍ॅन्सर वेबसाईटवर निकाल सोडला होता. मात्र, निकालात अनेक चुका दिसून आल्या आहेत.  फेरतपासणी करून निकाल द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. यानंतर शिक्षण खात्याने सुधारीत निकाल दिला आहे. मात्र तोही विद्यार्थ्यांना मान्य नाही. लेखी परीक्षेत  शंभरपैकी 10 ते 20 गुण मिळाले आहेत.  इंग्रजी, गणित, विज्ञान, भाषा आदी विषयांचे गुण कमी पडले आहेत. पेपर तपासणी व्यवस्थित झालेली नाही. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षक होण्यापासून वंचित राहणार आहेत. 

आता स्पर्धा परीक्षेत 50 टक्के, भाषा सामर्थ्य परीक्षेत 60 टक्के गुण अत्यावश्यक आहेत. अन्यथा पात्र ठरणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गोची झाली आहे. शिक्षक भरतीत अनेक त्रुटी आहेत.  त्या दुर कराव्यात, अशी मागणी होत आहे. शिक्षण खाते पहिल्या टप्प्यात चार हजार जागा भरणार आहे. पण, परीक्षेत उत्तीर्णांची संख्या कमी आहे. शिक्षण खात्याच्या नियमावलीत अनेक विद्यार्थी पात्र ठरले नाहीत. यामुळे जागा असूनही पात्रताधारक मात्र कमी आहेत. 

कर्नाटकात 2014 मध्ये पहिल्यांदा टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) झाली होती. त्यावेळी अवघा दोन टक्के निकाल लागला होता. त्यानंतर 2015 व 2016 मध्ये टीईटी झाली. सीईटी मात्र दोन वेळा झाली आहे. सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांतून शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. पण सीईटी अंतिम निकाल देण्यास उशीर केला आहे. यामुळे शिक्षक भरती रखडली आहे. सीईटी निकालाचा घोळ संपत नाही, तोपर्यंत शिक्षक भरती होणार नाही. विजापूर, बिदर आदी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची व प्राथमिक व माध्यमिक शिक्ष़णमंत्री एन. महेश यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. सुधारित निकालात त्रुटी आहेत. त्यात सुधारणा करा, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करून विद्यार्थी आत्महत्या करतील, असा इशारा दिला   आहे.  

पात्रताधारक नसल्याने...

बेळगा़व शैक्षणिक जिल्ह्यात ऊर्दू माध्यमाचा एकही विद्यार्थी पास झाला नाही. ऊर्दूच्या 11 जागा भरणार होत्या. मात्र पात्रताधारक नाही. हीच परिस्थिती अन्य ठिकाणी झाली आहे. यामुळे शिक्षण खात्याने मात्र अंतिम निकाल दिलेला नाही.