Sun, Jul 21, 2019 17:04
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › दोघांच्या वादाला आता ‘तिसरे वळण’

दोघांच्या वादाला आता ‘तिसरे वळण’

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 09 2018 9:38PM

बुकमार्क करा
 

बेळगाव : प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मात्र ग्रामीण मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विभागातील विकासकामावरून महिला काँग्रेस राज्याध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर व आ. संजय पाटील यांच्यात श्रेयवाद रंगला आहे. त्यामध्ये आता म. ए. समितीच्या जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी उडी घेतली असून या निधीसाठी आपणच प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. परिणामी दोघांच्या श्रेयवादात तिसर्‍याची ‘एंट्री’ झाली आहे. याबाबत माहिती देताना सरस्वती पाटील म्हणाल्या, कंग्राळी (बु.) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रामनगर परिसर बेळगाव महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र या भागाच्या विकासाकडे मनपानेे सातत्याने दुर्लक्ष चालविले आहे. या भागात कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी आदींच्या समस्या अनेक दिवसापासून भेडसावत आहेत. यासाठी स्थानिक नगरसेवक मोहन बेळगुंदकर यांच्यासह तत्कालीन महापौर सरिता पाटील व विद्यमान उपमहापौर नागेश मंडोळकर यांना भेटून समस्या सोडविण्याची विनंती केली होती. 

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनाही निवेदन दिले होते. त्यानुसार 100 कोटीच्या निधीतून या भागात विकासकामे सुरू  झाल्याचा सरस्वती पाटील यांनी दावा केला आहे. यापूर्वी या कामाचा शुभारंभ पालकमंत्री रमेश जारकीहोळी, आ. फिरोज सेठ यांच्या उपस्थितीत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. यासाठी आपण खास प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी वृतपत्रातून प्रसिद्ध केली. त्याला आक्षेप घेऊन आ. संजय पाटील यांनी हा शिष्टाचाराचा भंग असून आपण या भागाचे आमदार असून हा  निधी आपणच आणल्याचा दावा केला. आ. पाटील यांनी यासाठी मनपा आयुक्तांवर टीकेची झोड उठवून कारवाईची मागणी केली होती. मनपा कार्यालयाला घेराव घालून आपल्या अधिकारावर गदा आणल्याचा जाहीर आरोप केला होता. 

या निधी श्रेयवादाला येत्या विधानसभा निवडणुकीची पार्श्‍वभूमी असल्यामुळे अधिक महत्त्व आले आहे. चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीचा बार उडणार आहे. यामध्ये लक्ष्मी हेब्बाळकर व आ. पाटील पुन्हा एकदा परस्पराविरोधात उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. यामुळे ग्रामीण भागात हा वाद अधिक चर्चिला जात आहे. यामध्ये सरस्वती पाटील यांनी दावा करून रंगत आणली आहे. उपरोक्त निधी आपल्या मागणीनुसारच मंजूर झाल्याचा त्यांनी दावा केला आहे. यामुळे येत्या काळात पुन्हा रंगणार्‍या वादाकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.