निपाणी : महादेव बन्ने
एड्सला आतापर्यंतचा सर्वात घातक आजार मानला गेला आहे. ज्यामध्ये एचआयव्हीबाधित व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती समाप्त होते व ती व्यक्ती हळूहळू मृत्यूच्या दाढेत ढकलली जाते. जगामध्ये 15 तेे 24 वयोगटातील 6 हजार लोक प्रतिदिन एड्सच्या कक्षेत येत आहेत. त्यामुळे आता जनजागृती करण्याची वेळ आली आहे.
सन 1981 मध्ये जेव्हा पहिल्यांदा एड्सचा रुग्ण आढळून आला तेंव्हापासून आतापर्यंत जवळपास 2.5 कोटीहून अधिक लोकांना हा रोग झाला आहे. तर 4 कोटीहून अधिक लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे. एचआयव्ही संक्रमणामध्ये युवावर्ग अधिक आहे. एड्सग्रस्त व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर एड्स होतो, अशी बहुतांश लोकांना भीती वाटते. पण एड्सग्रस्त व्यक्तीच्या स्पर्शाने, त्याच्या अश्रूतून अथवा घामातून एड्सचे विषाणू पसरण्याची शक्यता नगन्य आहे, वैज्ञानिक परीक्षणाने सिध्द केले आहे. एड्सच्या प्रती आज लोक इतके चिंतेत आहेत की लग्नापूर्वी एचआयव्ही मुक्त असल्याचे प्रमाणपत्र देणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे बचाव व रोखणे हे दोनच उपाय एड्सच्या प्रसाराला रोखू शकतील.
पंचायत राज संस्था या प्रजातंत्रांच्या महत्वपूर्ण आधारस्तंभ आहेत. त्या एड्स विरुध्दच्या संघर्षामध्ये निर्णायक भूमिका घेऊ शकतात. या संस्था ग्रामीण भागात एड्सपासूनच्या बचावाची, माहितीचा प्रचार प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय करु शकतात. पंचायत प्रतिनिधींनी गावागावात जाऊन एचआयव्ही आणि एड्स नेमके काय आहेत ? यापासून कसा बचाव करता येईल, हे सांगण्याची गरज आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेनेेही पंचायतीच्या या कर्तव्यास ग्रामसंदेश नावाच्या पत्राद्वारे त्यांच्या भूमिकेला स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
पंचायतीने आपल्या क्षेत्रातील लोकांशी चर्चा करणे, ग्रामसभेमध्ये या विषयावर माहिती देणे, जत्रेवेळी याविषयी कार्यक्रम ठेवणे, कार्यशाळा भरविणे, आरोग्य तपासणी शिबिर यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. भारताची मुख्य ओळख ही ग्रामीण भागावर अवलंबून आहे. 75 टक्क्याहून अधिक जनता ग्रामीण भागात राहते. त्यामुळे जर हा भाग स्वस्थ आहे तर पूर्ण देश स्वस्थ आहे. त्यामुळे अशा भागात एड्सच्या नियंत्रणासाठी पंचायत राज एक सशक्त भूमिका निभावू शकते.