Wed, Jun 26, 2019 11:54होमपेज › Belgaon › ‘पाकिस्तान जिंदाबाद’प्रकरणी आ. फिरोज सेठ यांच्यावर गुन्हा

‘पाकिस्तान जिंदाबाद’प्रकरणी आ. फिरोज सेठ यांच्यावर गुन्हा

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:18AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि आमदार आ. फिरोज सेठ व समर्थकांनी मतदान प्रचारादरम्यान देशविरोधी घोषणा दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून आ. सेठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आ. फिरोज सेठ व समर्थकांकडून दि. 6 रोजी न्यू गांधीनगर येथे सभा घेऊन प्रचारफेरी काढण्यात आली होती. सभा संपून परतणार्‍या फिरोज सेठवर समर्थकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. असे करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप करत आ. फिरोज सेठ यांच्याविरोधात माळमारुती पोलिस ठाण्यात अ‍ॅड. प्रवीण करोशी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सेठ यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आ. सेठ यांचा खुलासा

सदर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर आ. फिरोज सेठ यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेऊन व्हिडीओ बोगस असल्याचा दावा  केला. काँग्रेस उमेदवाराचा पराभव करण्यासाठीच हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. समर्थकांनी देशविरोधी घोषणा दिलेल्या नसून माझ्या  व अजिम पटवेगार यांच्या नावाने घोषणाबाजी केली आहे, असे त्यांनी सांगितले. 

विरोधकांकडून सत्ता मिळविण्यासाठी अशाप्रकारचे व्हिडिओ व्हारल करण्यात येत आहेत. आपला सर्वसमाजातील नागरिकांशी सलोख्याचे संबंध आहेत. भाजपकडून निवडणुकीत गोंधळ घालण्याच्या उद्देशानेच ही कृती करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार नोंदविणार असल्याचे आ. सेठ यांनी सांगितले.