होमपेज › Belgaon › अकार्यक्षम पदाधिकार्‍यांची गय नाही

अकार्यक्षम पदाधिकार्‍यांची गय नाही

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 20 2018 11:44PMखानापूर : वार्ताहर

काँग्रेस पक्षाने देशहिताला प्राधान्य दिले आहे. देशात सामाजिक एकता नांदावी ह्या दृष्टीने सातत्याने सर्व जाती-धर्मामध्ये एकोपा राखण्याचा प्रयत्न झाला आहे. खानापुरातीलही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी काँग्रेसी विचारधार प्राणपणाने जपली आहे. मात्र अलिकडे काही पदाधिकारी केवळ नावापुरते असून त्यांच्याकडून पक्षहिताचे कोणतेही कार्य घडताना दिसत नाही. अशा पदाधिकार्‍यांनी त्वरीत कार्यास सुरवात करावी. अन्यथा गय केली जाणार नाही, असा इशारा केपीसीसीचे मुख्य सचिव पी. व्ही. मोहन यांनी पदाधिकार्‍यांना दिला.

येथील शिवस्मारकात मंगळवारी खानापूर काँग्रेसची सामान्य सभा झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. खानापूर ब्लॉक अध्यक्ष अशोक अंगडी यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले.

निवडणूक तोंडावर आली असून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. तालुका काँग्रेसमधील फुटीचा डाव नुकताच संपुष्टात आला आहे. त्यामुळे तालुक्यात काँग्रेसची एकहाती सत्ता कशी येईल हेच प्रत्येकाचे लक्ष असले पाहिजे, असे मत राज्य बालभवनच्या अध्यक्षा तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्या डॉ.अंजली निंबाळकर यांनी मांडले.

तालुक्याच्या सहा जि.पं.विभागात विभागवार बैठका घेऊन प्रत्येक ग्रा. पं. क्षेत्रात जागृती उपक्रम हाती घेण्यात यावेत. ज्येष्ठ कार्यकर्ते आणि  पदाधिकार्‍यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष होऊ नये,  प्रामुख्याने तालुक्यातील समस्या आणि भ्रष्टाचाराचे विषय हताळावेत, अशी सूचना ज्येष्ठ कार्यकर्ते जॅकी फर्नांडीस यांनी मांडली.

विभागवार बैठका घेऊन बुथ कमिट्या सक्षम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच उमेदवार कोणी असो पक्षासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन केपीसीसीचे निरिक्षक गोपाळ नाईक यांनी केले.

यावेळी औद्योगिक बँकेचे अध्यक्ष कृष्णा खानापुरी, गौसलाल पटेल, चंबान्ना होसमनी, महादेव कोळी, अशोक मुन्नवळी, भरमान्ना  लवगी, भारती पाटील, सावित्री मादार, नगरसेवक अभिषेक होसमणी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अन्वर बागवान यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. निंबाळकर यांची नुकतीच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. यानिमित्ताने त्यांचा खानापूर काँग्रेस कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. याआधी पक्षाने त्यांची राज्य मीडिया पॅनेल, राज्य बालभवन आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीवर निवड केली आहे.