Fri, Jul 19, 2019 22:04होमपेज › Belgaon › पीओपी ‘श्री’मूर्तीच बसविणार

पीओपी ‘श्री’मूर्तीच बसविणार

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 26 2018 11:31PMबेळगाव : प्रतिनिधी

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर तसेच मूर्तींच्या उंचीवर कोणतीही बंधने लादू नयेत, तसे केल्यास विरोध करण्याचा ठराव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत घेण्यात आला. 

शहापुरातील सीता-स्वयंवर हॉलमध्ये रविवारी सायंकाळी बैठक घेण्यात आली.  शहरातील 40 मंडळांचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने अचानकपणे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंधने घातली आहेत. पीओपीवर बंदी घातल्यास मूर्तींची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. बेळगावमध्ये कोणत्याही नैसर्गिक जलस्रोतात मूर्ती विसर्जन होत नाही. कुंड आणि तलावात विसर्जन केले जाते. यामुळे यावर घालण्यात आलेली बंधने चुकीची आहेत. यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पूजणारच, त्यास कितीही विरोध झाला तरी तो धुडकावण्याचा निर्धार घेण्यात आला. त्याचबरोबर गणेशमूर्तीच्या उंचीवर कोणत्याही मर्यादा घालू नयेत. हेस्कॉमने विजेच्या तारा भूमिगत करणे आवश्यक आहे. ती त्यांची जबाबदारी आहे. काही लोक यामध्ये राजकारण करीत आहेत. त्यामुळे ही दोन्ही बंधने आम्ही पाळणार नाही, असा ठराव यावेळी करण्यात आला.

यावेळी समस्त गणेश भक्त मंडळ महानगरपालिका बेळगावची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. याद्वारे प्रभागनिहाय समिती स्थापन करून गणेशाचे विसर्जन होईपर्यंत उत्सवावर देखरेख ठेवण्यात येणार आहे.

विजय जाधव, हेमंत हावळ, राजकुमार खटावकर, सुनील जाधव, रवी कलघटगी, गिरीश धोंगडी आदी उपस्थित होते.