Mon, Jul 22, 2019 05:02होमपेज › Belgaon › ‘पीओपी’ गणेशमूर्ती आजपासून जप्‍त करणार : जिल्हाधिकारी

‘पीओपी’ गणेशमूर्ती आजपासून जप्‍त करणार : जिल्हाधिकारी

Published On: Aug 21 2018 1:31AM | Last Updated: Aug 20 2018 11:43PMबेळगाव : प्रतिनिधी

प्लास्टर ऑफ पॅरिस तथा ‘पीओपी’च्या गणेशमूर्ती करणार्‍या मूर्तीकारांवर कारवाई करा, तसेच अशा मूर्ती जप्त करा, असा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारच्या बैठकीत दिला. त्यामुळे मंगळवारपासूनच बेळगाव शहरात ‘पीओपी’मूर्ती तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. 

कर्नाटकाने ‘पीओपी’ मूर्तींवर 2016 पासूनच बंदी घातली आहे. तथापि, गेली दोन वर्षे बंदीसाठी आग्रह धरला नव्हता. यंदा मात्र हा आग्रह धरून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. तथापि, गणेशोत्सव तोंडावर आला असताना या निर्णयाची अंमलबजावणी वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. 

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय आणि पोलिस अधिकार्‍यांची बैठक झाली. मंगळवारपासून  शहर परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून ‘पीओपी’ मूर्ती आणि त्याचे साहित्य जप्त करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्‍त डी. सी. राजाप्पा यांनी दिली. 

बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक सुधीरकुमार रेड्डी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. शशीधर नाडगौडा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला प्रदूषण नियंत्रण अधिकारी  जगदीश एच. यांनी शासकीय आणि न्यायालयीन आदेशाची माहिती दिली. त्यावर जिल्हाधिकारी झियाउल्‍ला म्हणाले, न्यायालयीन आदेश आणि शासनाच्या सूचनांचे काटकोर अंमलबजावणी करून गणेशोत्सव साजरा करायचा आहे. ‘पीओपी’ मूर्ती पर्यावरणाला घातक असून, ‘पीओपी’चा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे. सूचना देऊनही ‘पीओपी’ मूर्ती करणार्‍यावर यापुढे कारवाईकरण्यात येईल. जिल्ह्यात ज्या ठिकाणी अद्याप निर्मिती सुरु आहे, त्या ठिकाणी महापालिका आणि नगर पालिकांच्या अधिकार्‍यांनी पोलिसांची मदतीने तपासणी करुन तयार मूर्ती आणि तयार करण्याचे साहित्य तात्काळ ताब्यात घ्यावे.

पोलिस आयुक्‍त राजप्पा म्हणाले की, बेळगाव शहर परिसरात उद्या मंगळवारपासूनच पोलिस महापालिका अधिकार्‍यांच्या मदतीने तपासणी मोहीम राबवतील. मूर्तीकारांनी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीचे उत्पादन तात्काळ थांबवावे. 

गतवर्षीच ‘पीओपी’ मूर्ती करु वा विकू नका, अशा सूचना दिल्या असतानाही प्रतिसाद मिळाला नाही. यावर्षी आपाापल्या परिसरातील उत्पादकांची बैठक घेऊन प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती करु नका अशा सक्‍तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातून बरेच विक्रेते बेळगाव जिल्ह्यात येऊन ‘पीओपी’ मूर्तींची विक्री करतात. याबाबत आता पोलिसांची मदत घेऊन त्ंयांच्यावर कारवाइ करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण मंडळ अधिकार्‍यांनी दिली. 

सीमेवर तपासणी करणार

बेळगाव जिल्ह्यात ‘पीओपी’ साहित्य किंवा मूर्ती येऊ नयेत म्हणून बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवर विशेषत: कर्नाटक - महाराष्ट्र सीमेवर तपासणीसाठी नाके उभारण्यात येतील, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी बैठकीत दिली. गणेशोत्सव पूर्णपणे ‘पीओपी’मुक्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून तपासणी मोहिम हाती घेण्यात येईल. ‘पीओपी’ मूर्ती तयार होत असतील किंवा विक्रीसाठी येत असतील तर नागरिकांनी त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.