Sun, Jul 21, 2019 07:50होमपेज › Belgaon › कर्नाटक सरकारला बेळगावची ठिणगी चटका देणार; जारकीहोळींचा इशारा

...तर कर्नाटक सरकारचे पतन; जारकीहोळींचा इशारा

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 07 2018 8:05AMबेळगाव : प्रतिनिधी

पीएलडी बँक चेअरमनपदाच्या निवडणुकीत सतीश जारकीहोळी यांचा अपमान झाला, तर कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा देऊन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी राज्य सरकारचे पतन होण्याचे संकेत दिले आहेत. रमेश यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्याच्या राजकारणाचा परिणाम थेट राज्य सरकारवर होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले,  आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जारकीहोळी कुटुंबाला 90 कोटींचे कर्ज दिल्याचा दावा केला आहे.  पण, तेवढी वाईट परिस्थिती आमच्यावर आलेली नाही. त्यांच्याकडून खालच्या पातळीचे राजकारण केले जाईल, अशी अपेक्षा नव्हती. कुणावरही उपकार केले तर ते कधी सांगू नयेत, असे म्हटले जाते. पण, आज अनिवार्यता निर्माण झाली आहे. 2007 मध्ये हेब्बाळकर यांचे वडील कॅन्सरने आजारी होते. त्यावेळी त्यांना मदत केली. त्यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी यांना पैशाअभावी हैदराबाद विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. त्यावेळीही मदत केली होती. बोम्मई किंवा उमेश कत्ती विरोधक असले तरी त्यांच्याकडून अशा प्रकारचे राजकारण कधीच झाले नाही. सिद्धरामय्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अस्तित्वात असताना हेब्बाळकर यांना दिल्‍लीचा मार्ग दाखविला होता.

रमेश म्हणाले, पीएलडी बँक निवडणुकीत आपले 9 सदस्य निवडून आले होते. त्यानंतर हेब्बाळकर यांनी घोडेबाजार केला आहे. हेब्बाळकर कोण आहेत, त्यांचा इतिहास काय? त्यांना लगाम घातला पाहिजे. जिल्ह्यातील दोन आमदारांच्या वैयक्‍तिक प्रतिष्ठेमुळे काँग्रेस-निजद युती सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  याची चर्चा आता केवळ राज्य नव्हे राष्ट्रीय पातळीवर सुरू झाली आहे.

गुरूवारी (दि. 6) बंगळुरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बेळगावातील राजकारणावर काही तास चर्चा झाली. एका बँक अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून वादंग निर्माण होणे धोक्याचे असल्याचे मत अनेक मंत्र्यांनी व्यक्‍त केले. पक्षातील समस्या, वैयक्‍तिक राजकारणाबाबत पक्ष पातळीवर चर्चा करून तोडगा काढता येतो. पण, जाहीर वक्‍तव्ये, पत्रकार परिषदांमुळे विरोधी पक्षातील नेत्यांना आयते कोलीत मिळणार असल्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडुराव दिल्‍ली दौर्‍यावर आहेत. त्यांनी हेब्बाळकर यांच्याशी संपर्क साधून काही सूचना केल्या. कोणत्याही कारणास्तव युती सरकारला अडचणीत आणू नये. स्वप्रतिष्ठा बाजूला ठेवून सर्वांनी पक्ष संघटनेसाठी, सरकार सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न करावेत. पक्षातीलच आमदारांविरोधात असणारे वैमनस्य तूर्तास दूर ठेवण्याचा सल्‍ला त्यांनी दिल्याचे समजते. उपमुख्यमंत्री डॉ. परमेश्‍वर यांनीही या वादावर पडदा टाकून पक्ष वरिष्ठांशी चर्चा करण्याचा सल्‍ला दिला आहे. याआधी सिद्धरामय्यांनी बंडाची भूमिका घेतली होती. आता जारकीहोळी बंधू नाराज आहेत. याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.

भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर?

रमेश जारकीहोळी यांना भाजपने गळ घातल्याची चर्चा आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याचे समजते. ही ऑफर त्यांनी मान्य केल्यास जारकीहोळींसह काही आमदार काँग्रेसमधून बाहेर पडतील. त्यांच्या राजीनाम्यानंतर युती सरकार कोसळेल. यामुळे भाजपला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.