Sun, Aug 18, 2019 20:34होमपेज › Belgaon › पीएलडी बँकेवरून रणसंग्राम

पीएलडी बँकेवरून रणसंग्राम

Published On: Aug 29 2018 1:41AM | Last Updated: Aug 29 2018 12:42AMबेळगाव : प्रतिनिधी

पीएलडी बँकेच्या गायब संचालकाशी संपर्क घडवून आणा, निवडणूक पुढे ढकला, आदी मागण्यांसाठी आ. सतीश जारकीहोळी समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. तीन संचालकही सहभागी होते. 

जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पीएलडी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी मंगळवारी निवडणूक होणार होती मात्र आ. लक्ष्मी हेब्बाळकर समर्थकांनी काही संचालक गायब केले आहेत. त्यांच्याशी आमचा संपर्कही झालेला नाही. काहींना आमीषे तर काही जणांना धमकी देण्यात आलेली आहे. त्यामुळे तहसिलदारांनी ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली असून, हा निर्णय योग्य आहे.

आंदोलनामध्ये बँकेचे संचालक महांतेश उळ्ळागड्डी, रामण्णा गुळ्ळी,  प्रसाद पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य शंकरगौडा पाटील, एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, नगरसेविका जयश्री माळगी, माजी महापौर शिवाजी सुंठकर आदी सहभागी झाले होते.

विरोधकांकडून राजकारण : हेब्बाळकर

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून जनतेने आपणाला विकास कामासाठी निवडून दिले आहे. पीएलडी बँकेतील 12 संचालकांपैकी 9 जण आपल्यासोबत आहेत. ज्यांचे संख्याबळ अधिक त्यांचाच अध्यक्ष, उपाध्यक्ष झाला पाहिजे, असे असताना काही जणांकडून कायदा व सुव्यवस्था  बिघडविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पत्रकार परिषदेत केला.आपण कोणत्याही उमेदवाराचे अपहरण केलेले नाही. तरीही  पोलिसांत तक्रार करण्यात आली, असे सांगून त्यांनी सर्व 9 संचालकांना पत्रकार परिषदेमध्ये हजर केले. शिवाय पोलिस  प्रशासनाने बी रिपोर्ट दिल्याची कागदपत्रेही सादर केली. 

काही जणांकडून राजकारण जात आहे. आहे. आपले जारकीहोळी बंधुंशी कोणतेही राजकीय वैमनस्य नाही. मात्र कोणत्याही कारणाशिवाय पीएलडी बँक अध्यक्ष निवडणूक तहसीलदार मंजुळा नाईक यांना सेवेतून निलंबित करेपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहील, असे आ.हेब्बाळकर यांनी सांगितले. यावेळी मराठी भाषिक असलेले व समितीशी एकनिष्ठ असलेले बाबू पिंगट यांच्यासह ता.पं. अध्यक्ष  शंकरगौडा पाटील, बुडा माजी अध्यक्ष युवराज कदम यांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.