Mon, May 27, 2019 00:40होमपेज › Belgaon › ओव्हरलोड ऊस वाहतूक...अपघाताला आमंत्रण

ओव्हरलोड ऊस वाहतूक...अपघाताला आमंत्रण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

निपाणी : राजेश शेडगे

चिकोडी-निपाणी तालुक्यासह विविध भागात ऊसतोडणी हंगाम जोमाने सुरू आहे. यामुळे शहरातून उसाने भरलेली वाहने ये-जा करीत असून ओव्हरलोड झालेली ही वाहने अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहेत. निपाणी बसस्थानकासमोरील ध. संभाजीराजे चौक तर वाहतुकीच्या वर्दळीने गजबजला असताना बेधुंद गाण्याच्या धुंदीत ट्रॅक्टर चालविले जातात. ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागे पुढे असणार्‍या दुचाकीधारक व पादचार्‍यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

निपाणीत  एकच साखर कारखाना असला तरी परिसरातील अन्य कारखान्यांच्या गळीतासाठी उसाची उचलही या भागातूनच होत आहे. बैलगाड्यांचे प्रमाण कमी असले तरी ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे मोठ्या प्रमाणावर उचल केली जात आहे. क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून ही वाहतूक होत असल्याने अरुंंद रस्ते ऊस वाहतुकीने पॅक होताहेत. ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू आहे. त्यामुळे ऊसवाहू वाहनांची मोठी वर्दळ रस्त्यांवर दिसून येते. ट्रॅक्टर ट्रॉलींची ऊस वाहतूक क्षमता 14 ते 16 टन असते. परंत प्रत्यक्षात 16 ते 20 टन ऊस वाहून नेला जात आहे. 

क्षमतेपेक्षा जादा ऊस वाहून नेला जात असल्याने अनेकवेळा ट्रॅक्टर रस्त्यावर उलटण्याचे प्रकारही वाढले आहेत. ट्रॅक्टर चालकाला मागील ट्रेलरचा अंदाज येत नाही. त्यामुळे ट्रॉली हेलकावे खात रस्त्यावर इकडे तिकडे करते. याचा फटका मागून येणार्‍या दुचाकी धारकास बसू शकतो. अशा प्रकारचे अनेक अपघात यापूर्वी झाले आहेत. ऊस वाहतूक करणार्‍यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. निष्पापांना मात्र बळी जावे लागते.  रात्री तर अनेक ट्रॉल्या दिसतच नाहीत. रिफ्लेक्टर नसल्याने वाहनधारकांना पुढे ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर आहे याचा अंदाज येत नाही. यातूनही अपघात होतात. 

ऊसवाहू ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात होतात. ओव्हरलोड झालेल्या या वाहनांमुळे वाहतूक कोंडीही होते. त्यामुळे दुचाकीस्वार व पादचार्‍यांना जीव मुठीत धरूनच जावे लागते. मोठ्या आवाजातील गाणी लावणे बंद केले आणि वाहतुकीचे नियम पाळून क्षमतेएवढ्याच उसाची वाहतूक केली तर अपघातांचे प्रमाण घटणार आहे. यासाठी पोलिस प्रशासनाने या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. निपाणी मोठ्या वाहतुकीच्या वर्दळीचे ठिकाण झाल्याने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.