Wed, Jul 24, 2019 12:17होमपेज › Belgaon › पाश्‍चात्यांचे अंधानुकरण नको

पाश्‍चात्यांचे अंधानुकरण नको

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 11:52PMबेळगाव : प्रतिनिधी

भारतीय संस्कृती जगामध्ये वंद्य आहे. यामध्ये अनेक चांगले संस्कार आहेत. परंतु याचा विसर नव्या पिढीला होत चालला असून डे संस्कृती बोकाळली आहे. पाश्‍चात्यांंचे अंधानुकरण थांबवून हिंदू संस्कृतीचे संवर्धन करा, असे आवाहन साध्वी सरस्वती यांनी केले.

धर्मवीर संभाजी उद्यान येथे रविवारी सायंकाळी ‘भक्तीशक्ती हिंदू मेळाव्या’चे आयोजन श्रीरामसेना व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महापौर संज्योत बांदेकर होत्या.व्यासपीठावर निपाणी मठाचे प्राणलिंग स्वामी, श्रीरामसेना जिल्हाप्रमुख रमाकांत कोंडुसकर, तालुकाप्रमुख रविकुमार कोकितकर, खानापूर तालुकाप्रमुख पंडित ओगले, गोकाक तालुकाप्रमुख राजू जाधव होते.

साध्वी सरस्वती म्हणाल्या, हिंदूंना आपले हक्‍क मिळविण्यासाठी आपल्याच देशात झगडावे लागत आहे. हे दुर्दैव आहे. देशात एकीकडे गरीब अतिगरीब होत चालला आहे, तर दुसरीकडे श्रीमंतांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. हे धोकादायक आहे. हे थांबविणे अत्यावश्यक असून अन्यथा यातून भ्रष्टाचार फोफावल्याशिवाय राहणार नाही.भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस प्रेमाचा आहे. परंतु अलीकडे व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली वाईट प्रकार सुरू आहे. हे थांबवावे लागणार आहे. अन्यथा युवक वेगळ्या वाटेला लागल्याशिवाय राहणार नाही, असे त्या म्हणाल्या.

मेघाताई कदम म्हणाल्या, लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यात येत आहे. यामुळे मुलींनी सावध राहावे. यातून दहशतवाद वाढत चालला असून प्रत्येक मुलीचे संरक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

रमाकांत कोंडुसकर, राजू जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. बेळेभट (ता. चंदगड) येथील शहीद जवान अनंत धुरी यांचे वडील जानबा धुरी यांचा सत्कार करण्यात आला.