Fri, Mar 22, 2019 08:25होमपेज › Belgaon › देशी गायींच्या संगोपनाकडे लक्ष द्या

देशी गायींच्या संगोपनाकडे लक्ष द्या

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 12 2018 8:19PMउचगाव : वार्ताहर

आपल्या देशात संकरित गायींची पैदास वाढली तसे नागरिकांना अनेक आजारांनी ग्रासले. यासाठीच जर्सी गायीला सोडून देशी गायीकडे जेव्हा शेतकरी वळेल तेव्हाच पुन्हा एकदा आरोग्यात चांगला बदल घडेल, असे मत सेंद्रिय शेती या विषयावर बोलताना कालकंठदास यांनी व्यक्त केले.

उचगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जि. पं., कृषी खाते व उचगाव हुबळी रयत संपर्क केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 20 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील 42 गावातील शेतकर्‍यांसाठी कृषी अभियान आणि कृषी वस्तू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्याख्याते म्हणून कालकंठदास बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रा.पं. अध्यक्षा योगिता देसाई होत्या.

कालकंठदास पुढे म्हणाले, सातत्याने रासायनिक खतांचा वापर करून शेतातून निर्माण होणारे उत्पादनही धोकादायक बनत चाललेला आहे. यासाठी सेंद्रिय खताचाच वापर झाला पाहिजे. शिवाय जनावरांना रोज मोकळ्या हवेत सोडले पाहिजे.  स्वच्छ पाणी, गोठा स्वच्छता आदी काळजी घेतल्यास जनावरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि दूध सकस तयार होते. 

आप्पासाहेब कीर्तने यांनी शेतवडीमध्ये पाणी साठा अधिकाधिक साठवून ठेवण्याच्या प्रक्रियेकडे शेतकर्‍यांनी लक्ष दिले पाहिजे. बांबू लागवड, औषधी वनस्पतींची लागवड, शेवग्याच्या शेंगांनी तसेच इतर सर्वच प्रकाराच्या रोपांची लागवड आजच्या घडीला महत्त्वाची आहे, असे सांगितले.

डॉ. प्रताप हन्नूरकर यांनी जनावरांची पैदास कशी वाढली पाहिजे, जनावरांचा चारा, खुराक, दूध वाढीसाठी प्रयोग आदी विषयांवर मार्गदर्शन केले. नारायण नलवडे यांनीही शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.   प्रारंभी गोमातेचे पूजन आ. संजय पाटील व योगिता देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन जि.पं. आरोग्य व वस्थायी कमिटीचे अध्यक्ष मोहन मोरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कृषी अभियानाचा प्रारंभ आ. संजय पाटील, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, योगिता देसाई, ग्रा.पं. उपाध्यक्ष शिवाजी कुरबूर आदींच्या हस्ते करण्यात आला.

बेळगाव तालुका सहाय्यक कृषी संचालक जी. बी. कल्याणी यांनी प्रास्ताविकात कृषी अभियानाची माहिती दिली. रयत संपर्क केंद्र उचगावच्या कृषी अधिकारी सविता पाटील यांनी स्वागत केले.

शेतीविषयी मार्गदर्शनाची गरज

जि.पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने आज शेतीविषयी मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगून आज शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानामध्ये मोठा बदल होत चालला आहे. त्याचे ज्ञान मिळणे गरजेचे आहे ते अशा कृषी अभियानातूनच मिळते, असे सांगितले.