Wed, Apr 24, 2019 21:53होमपेज › Belgaon › वृद्ध आई-वडिलांना दरमहा ४ हजार पोटगी देण्याचा आदेश

वृद्ध आई-वडिलांना दरमहा ४ हजार पोटगी देण्याचा आदेश

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 15 2018 11:14PMबेळगाव : प्रतिनिधी

आपल्या वृद्ध आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी झटकणार्‍या नारायण प्रकाश ऊर्फ परशराम यळ्ळूरकर (45) रा. हिंडलगा याला येथील कौटुंबिक न्यायालयाचे न्या. मंजुनाथ यांनी दरमहा चार हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश बजावला आहे. 

लक्ष्मी गल्ली हिंडलगा येथील प्रकाश ऊर्फ परशराम अप्पुनी यळ्ळूरकर (75) व त्यांची पत्नी मल्लव्वा यांनी आपला मुलगा परशराम यळ्ळूरकर (45) रा. बेकिनकेरे यांच्याविरोधात येथील कौटुंबिक न्यायालयात पोटगी देण्याचा दावा दाखल केला होता. मुलगा व त्याची पत्नी आपल्याला मानसिक व शारीरिक त्रास देतात व सांभाळ करण्यास नकार देतात, असा खटला दाखल केला होता. 14 गुंठे शेतजमीन व दोन घरे आपल्या नावावर आहेत. परंतु वृद्धापकाळामुळे आपल्याला त्या मालमत्तेचा सांभाळ करणे कठीण जात आहे. सदर मालमत्ता आपल्या नावे करण्यासाठी मुलगा आम्हाला त्रास देत आहे. 

मुलगा बेळगावातील एका वृत्तपत्रामध्ये नोकरी करत असून त्याला दरमहा 12 हजार रुपये पगार आहे, अशी तक्रार त्यांनी केली होती. या खटल्याची सुनावणी न्या. मंजुनाथ यांनी करून आई मल्लव्वाला दरमहा दोन हजार रुपये व वडील प्रकाश यांना दरमहा दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश बजावला आहे. अर्जदारांतर्फे अ‍ॅड. विश्‍वास जाधव यांनी काम पाहिले.