Tue, Mar 26, 2019 01:38होमपेज › Belgaon › बंदुका जमा करण्याबाबत निरुत्साह

बंदुका जमा करण्याबाबत निरुत्साह

Published On: Mar 22 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 10:30PMखानापूर : वासुदेव चौगुले

पिकांच्या रक्षणासाठी घेण्यात आलेल्या परवानाधारक बंदूकधार्‍यांना निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस स्थानकात बंदुका जमा करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. बंदुका जमा करुन घेताना खात्याकडून गावोगावी जाऊन शेतकर्‍यांना जमा करण्याचे आवाहन केले जाते. पण निवडणूक संपताच बंदुका परत करण्याच्यावेळी मात्र शेतकर्‍यांना पळापळ लावली जाते. परिणामी वेळेत बंदुका जमा करण्याकडे बंदूकधार्‍यांनी चालढकल चालविली असल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक काळात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न उद्भवू नये. तसेच निवडणुका शांततेच्या वातावरणात पार पाडाव्यात. यासाठी सर्व बंदूक, रिव्हॉल्वरधारकांना त्यांची शस्त्रे संबंधित पोलिस स्थानकात जमा करण्याचे आवाहन केले जाते. त्यानुसार निवडणुकीपूर्वी बंदुका जमा केल्या जातात. मात्र एकदा का निवडणूक झाली की, संबंधित शेतकर्‍यांना आपली बंदूक परत मिळविताना अनेकदा पोलिस स्थानकाचे हेलपाटे मारावे लागतात. हा प्रत्येक निवडणुकीत आलेला अनुभव असल्याने बहुसंख्य शेतकर्‍यांकडून बंदुका जमा करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.

ज्या सौजन्यपूर्ण वागणुकीने बंदुका जमा करुन घेतल्या जातात त्याच पद्धतीने परत देतानादेखील शेतकर्‍यांना ताटकळत न थांबविता विनाविलंब त्यांचे वितरण होणे आवश्यक आहे. असे झाल्यास आपसूकच शेतकर्‍यांचा वेळेत बंदुका जमा करण्याकडे कल वाढेल. तालुक्यातील बहुतांश शेतजमीन ही जंगलभागाभोवती आहे. अशाठिकाणी वन्यप्राण्यांचा शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागतो. रात्री-अपरात्री पिकाच्या राखणीसाठी शिवाराकडे जावे लागते. अशावेळी पिक संरक्षणासाठी बंदुकांची गरज भासते. त्यामुळे बंदूक परवान्यांच्या मागणीत मागील पाच वर्षापासून सातत्याने वाढ होत आली आहे.

निवडणुकीच्या काळात बंदुका जमा करताना पोलीस खात्याला संपूर्ण तालुक्यातील गावांचा दौरा करावा लागत असल्याने त्या जमा करुन त्यांची माहिती निवडणूक विभागाला कळविणे. आदी सोपस्कार पार पाडावे लागतात. हे करताना पोलिस खात्याला धावपळ करावी लागते. त्यामुळे आता नव्या बंदूक परवान्यांसाठी नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे. परिणामी बंदूकधार्‍यांना बंदुकीच्या वापरापेक्षा पोलिस खात्याच्या टोलवाटोलवीचाच अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

आठ दिवसांची मुदत

ज्यांनी अद्यापही पोलिस स्थानकांत बंदुका जमा केल्या नाहीत. त्यांनी आठ दिवसांत त्वरित जमा कराव्यात. अन्यथा त्यांच्या बंदुका कायस्वरुपी जप्त करण्यात येतील, असे आवाहन पोलीस खात्याने केले आहे.

 

Tags : belgaon, belgaon news, Karnataka State Elections, guns, police station,