होमपेज › Belgaon › आज झटपट मतदार नावनोंदणीची संधी 

आज झटपट मतदार नावनोंदणीची संधी 

Published On: Apr 08 2018 2:10AM | Last Updated: Apr 08 2018 12:16AMबेळगाव :

निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या  आधी रविवार दि. 8 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत ‘झटपट मतदार नोेंदणी’ अभियान राबविण्यात येणार आहे. रविवारी सार्वजनिक सुटीदिवशी अधिकाधिक मतदारांना आपली नोंदणी करणे सुलभ ठरावे, यासाठी सदर अभियान राबविण्यात येणार आहे. नवीन नावनोंदणी, एका मतदारसंघातून दुसर्‍या मतदारसंघात पत्ता बदलला असेल तर, एकाच मतदारसंघात पत्ता बदलला असेल तर, नोकरीनिमित्त एका मतदारसंघातून दुसर्‍या मतदारसंघात स्थलांतरित झाला असेल तर किंवा नावात चूक, पत्त्यात चूक झाली असेल तर विशिष्ट प्रमाणपत्रे सोबत घेऊन गेल्यास सारी दुरुस्ती केली जाईल. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्जाला सोबत असलेली प्रमाणपत्रे जोडा आणि निवडणूक अधिकार्‍यांकडे द्या.नाव नोंदण्यासाठी पुढील परिस्थितीत कोणत्या कागदपत्रांची गरज आहे हे तपासा आणि जिल्हाधिकारी कार्यालायात जा.

नवीन मतदार नोंदणी?

पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रहिवासी दाखला, चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), शिधापत्रिका, भाडे करारपत्र, गॅसजोडणी पत्र, पासपोर्ट, वीज बिल पावती, आधार, बँक 
पासबुक यापैकी एक प्रमाणपत्र.

...नावनोंदणी

करायची झाल्यास लग्‍न होऊन नवर्‍याच्या घरी गेल्यास नवर्‍याचे मतदान ओळखपत्र, विवाह नोंदणी पत्र, लग्‍नपत्रिका.

पत्त्यात बदल

भाडे करारपत्र,  रहिवासी दाखला घेऊन पत्ता बदलून घेणे. भाडे करारपत्र, नोकरीला असणार्‍या कंपनीचे ओळखपत्र.

गत निवडणुकीत मतदान केले मात्र यावेळी यादीत नाव नाही?

अर्जाबरोबर मतदाराचे ओळखपत्र लावावे. ओळखपत्र नसल्यास मोबाईल  क्रमांक, आई-वडील अथवा नाव नोंदणी केलेल्या मतदान ओळखपत्राचा क्रमांक

कशासाठी कोणता अर्ज?

 नमुना 6 : 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना नवीन नोंदणी करण्यासाठी, एका मतदार संघातून दुसर्‍या मतदारसंघात स्थलांतर केल्यास मतदारयादीत नावनोंदणीसाठी
 नमुना 6 अ : अनिवासी भारतीयांचे नाव मतदारयादीत दाखल करण्यासाठी
 नमुना 7 : दोन मतदारसंघात नाव असल्यास एका मतदारसंघातील नाव कमी करण्यासाठी
 नमुना 8 : मतदार यादीत नाव, पत्ता, वय चुकीचे नोंद असल्यास दुरुस्ती करण्यासाठी
 नमुना 8 अ : एकाच मतदारसंघात दुसरीकडे नाव नोंदणीसाठी

कुठे कराल नोंदणी?

मतदार नोंदणीची प्रक्रिया आपल्या जवळच्या प्रत्येक मतदान केंद्रावर होणार आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध असतील. त्यामुळे आपल्या घरापासून जे मतदान केंद्र जवळ आहे, तिकडे जा आणि दुरुस्ती करून घ्या, असे जिं. पं. सीईओ आणि स्वीपचे मुख्याधिकारी आर. रामचंद्रन यांनी कळविले आहे.