Mon, Apr 22, 2019 15:46होमपेज › Belgaon › दोनदा उद्घाटन, कामाचे फलित काय?

दोनदा उद्घाटन, कामाचे फलित काय?

Published On: Mar 08 2018 8:42PM | Last Updated: Mar 08 2018 8:23PMनिपाणी :  प्रतिनिधी

बहुप्रतीक्षित निपाणी तालुका अखेर कार्यरत झाला. तहसीलदार कार्यालयाचे दोनवेळा उद्घाटन करून पालकमंत्री व आजी-माजी आमदारांनी काय फलित साधले, असा सवाल निपाणीकरांतून व्यक्‍त होत आहे. नव्या तालुक्यासमोर अनेक समस्या असून ही आव्हाने सोडविण्याचे काम आता लोकप्रतिनिधींना करावे लागणार आहे.

निपाणी तालुक्याची मागणी ही जुनी असली तरी आता तालुका निर्माण झाल्यावर श्रेयवादासाठी काँग्रेस आणि भाजप नेतेमंडळी पुढे सरसावली आहेत. आ. शशिकला जोल्ले व त्यांच्या समर्थकांनी 26 फेब्रुवारी रोजी तहसलीदार कार्यालयाचे उद्घाटन केले होते. मात्र यावेळी पालकमंत्री व अधिकारीवर्ग अनुपस्थित होता. 7  रोजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते पुन्हा याच कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यातून नेमके काय फलित साधले, असा सवाल व्यक्‍त होत आहे.

पाणीपुरवठ्याच्या विविध योजना आवश्यक

निपाणी तालुक्यासमोर शेती पाण्याचा प्रश्‍न असून निपाणी तालुका सुजलाम आणि सुफलाम होण्यासाठी पाणीपुरवठ्याच्या विविध योजना राबविणे, शेततळी उभारण्यास प्राधान्य देणे, कोरडे पडलेले पाझर तलाव भरणे, तंबाखूला पर्यायी पिके घेण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.वेदगंगा व दूधगंगा नद्यांचे पाणी निपाणी मतदारसंघातील अनेक गावांना वरदान ठरले आहे. काळम्मावाडी करारानुसार वेदगंगा नदीला मिळणार्‍या पाण्यावर सीमाभागातील शेतकरी अवलंबून आहेत. पण अनेकदा वेदगंगा नदी कोरडीच असते. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना अत्यावश्यक  आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून कालव्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पण कुर्ली, आप्पाचीवाडीपर्यंतच कालव्याचे पाणी येऊन पोहचत असून सौंदलगा, आडी, बेनाडीसह परिसरातील शेतकर्‍यांना कालव्याच्या पाण्याचा अद्याप लाभ झालेला नाही. 

औद्योगिक विकासाची गरज

विकासापासून वंचित असलेले निपाणी शहर आता बँकिंग हब होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांबरोबर व्यापारी बँका, सहकारी बँकांच्या शाखा मोठ्याप्रमाणात निपाणीत येत आहेत. पण त्याच्या तुलनेत औद्योगिक विकास मात्र खुंटलेला असून बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाच्या दृष्टीकोनातून प्रयत्न आवश्यक आहेत.

सर्वांगीण विकासासाठी आराखडा आवश्यक

शासनाच्या स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविणे निपाणी तालुक्यातील विविध गावांना आवश्यक आहे. अनेक गावात आजही उघड्यावर शौचास बसणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. शहरासह ग्रामीण भागांना रोज मुबलक आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही. रस्ते, गटारी यांची समस्या असून निपाणी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विकासाचा आराखडा करणे योग्य ठरणार आहे.

निपाणी तालुक्याला मोठ्या क्रीडांगणाची, पोहण्याच्या तलावाची तसेच शासकीय अभियांत्रिकी आणि मेडिकल कॉलेजची गरज आहे. पालकमंत्री जारकीहोळी यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर निपाणीचा विकास करण्याचे सुतोवाच केले आहे. तालुक्यासाठी मिळणारे अनुदान मोठे असल्याने निपाणीच्या विकासाला आता चालना मिळणार आहे.