Thu, Apr 25, 2019 17:33होमपेज › Belgaon › गणेशोत्सवाला उरले फक्त ४५ दिवस : मूर्तिकारांची लगबग 

गणेशोत्सवाला उरले फक्त ४५ दिवस : मूर्तिकारांची लगबग 

Published On: Jul 30 2018 1:28AM | Last Updated: Jul 30 2018 12:04AMबेळगाव : प्रतिनिधी

काही दिवासांपासून शहरातील गणेशशाळा गजबजू लागल्या आहेत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेधही भक्तांना लागले आहेत. अवघ्या 45 दिवसांवर यंदाचा गणेशोत्सव 13 सप्टेंबरला येऊन ठेपल्याने आतापासूनच सोशल मीडियावर संदेशाची देवाण घेवाण केली जात आहे. बाजारपेठेतही साहित्य दाखल झाले आहे.  

शहरात सध्या शाडूपासून गणेशमूर्ती तयार करण्यावर मूर्तिकारांनी भर दिला आहे. रंगरंगोटीच्या कामांनाही गती देण्यात आली आहे.  पावसाने उघडीप दिल्याने कामाला गती आली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तिकार विविध रुपांतील गणेश मूर्ती साकारण्यात मग्‍न झाले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती बनवण्याच्या कामालाही गती देण्यात आली आहे.  शहराबरोबर ग्रामीण भागातही काही दिवसांपासून बाप्पांच्या आगमनाची चाहूल सर्वांनाच लागल्याचे चित्र दिसत आहे. 

बेळगावचा गणेशोत्सव लय भारी असे बेळगावकरांचे म्हणणे आहे. त्यानुसार ढोलताशे, झांझ पथक मंडळांच्या तयारीलाही वेग आला आहे. गणेशोत्सव काही दिवसावर असल्याने बाजारात सजावटीचे साहित्यही दाखल झाले आहे. बेळगावमध्ये गणेशोत्सवानंतर मूर्ती विसर्जन करण्यासाठी नैसर्गिक तलाव निर्माण केले जातात. त्यामुळे प्रदूषण होण्याचा प्रश्‍न होत नाही. गतवर्षी अशी भूमिका गणेशोत्सव मंडळाने मांडली होती. 2013 पासून बेळगावमध्ये कमी उंचीच्या सार्वजनिक गणेश मूर्ती व घरगुती शाडूच्या गणेश मूर्ती पुजण्यासाठी प्रदूषण मंडळ आग्रही आहे. मात्र शहर व परिसरात शाडू मूर्तिकार हाताच्या बोटावर मोजण्याइतके असल्याने गणेशोत्सव काळात मूर्ती कमी पडतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. शाडूच्या मूर्ती वजनाने जास्त व पीओपीच्या वजनाने हलक्या त्याशिवाय किमतीतही तफावत असल्याने गणेशभक्त शाडूपेक्षा पीओपीला पसंती देत आहेत. मात्र, बंदी असल्याने त्यांना अडचणही झाली आहे. 

पीओपी की शाडू ?

गतवर्षी जिल्हाधिकार्‍यांनी जलप्रदूषण होऊ नये म्हणून बेळगावातील मूर्तिकारांना शाडूच्या मूर्ती करण्याचा फतवा काढला. नोटीस देऊन त्यासोबत फोटो काढून घेतला. पीओपीच्या मूर्ती केल्या तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. मूर्तिकारांनीही निवेदनामार्फत पीओपीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली होती. बेळगावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भक्त यांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यामुळे पीओपीसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी मवाळ भूमिका घेतली. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी डिसेंबरमध्ये होणारी कारवाई यंदा जिल्हाधिकार्‍यांनी हाती घेतली नाही. यामुळे शाडू की पीओपी, यासंदर्भात मूर्तिकार व क्त संभ्रमात आहेत. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 2015 साली आलेल्या आदेशाप्रमाणे गणेशोत्सव काळात पीओपीच्या गणेशमूर्ती पुजू नयेत. त्या पाण्यात न विरघळल्यामुळे जलप्रदूषण होते. शाडूच्या मूर्तीबरोबरच म्हैसूर येथील कंपनीतून बनविलेल्या रासायनिक रंगाचा वापर करावा, असा फतवा काढला होता. मात्र याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाला यंदादेखील वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. गतवर्षी बंगळुरात शासनाने कारवाई करून पीओपीपासून मूर्ती बनविण्याचे कारखाने बंद पाडले होते. यंदा शासनाने मवाळ धोरण स्वीकारले आहे.