Tue, Oct 22, 2019 02:37होमपेज › Belgaon › २९ गावांसाठी केवळ ११ तलाठी

२९ गावांसाठी केवळ ११ तलाठी

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 15 2018 8:21PMनिपाणी : प्रतिनिधी

नूतन निपाणी तालुक्यासाठी महसूल दप्तरी नव्या तहसीलला शहरासह परिसरातील 53 गावे जोडली आहेत. सध्या प्रशासकीय पातळीवर आवश्यक असणार्‍या तलाठीसह विकासाधिकारी आणि सचिवपदांचा अनेक जागा रिक्त आहेत. आठ-दहा वर्षात रिक्त जागा भरलेल्या नसून सज्जाफोडअभावी कार्यरत असलेल्या निपाणी सर्कलमधील 29 गावांसाठी केवळ 11 ग्राम तलाठी कार्यरत आहेत. शिवायय ग्रामविकासाधिकार्‍यांसह सचिवांची संख्याही तोकडीच असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. 

शासकीय योजना कार्यान्वित करण्यासह शेती, घरांचे उतारे, नाव नोंदणी, खातेफोड, पीकपाणी दप्तर नोंदणीसह जन्म-मृत्यूची नोंद, घरकूल अशा अनेक बाबींची पूर्तता  तलाठी व पंचायत कार्यालय स्तरावर होत असते. त्यामुळे आवश्यक अधिकारी कायमस्वरूपी कार्यरत असणे गरजेचे आहे. सध्या मुबलक अधिकार्‍यांअभावी एकेका अधिकार्‍यांवर अतिरिक्त कामाची जबाबदारी पडत आहे.  त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांच्या गावपातळीवरील कामकाजाचे दिवस ठरले आहेत. त्यामुळे नागरिक, नोकरदार, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सध्या कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी, ग्रामविकासाधिकारी, सचिव यांची शिफारस अथवा प्रमाणपत्राची गरज असते. एकूण जमीन क्षेत्रासह हिडवळी दाखल्याचीही आवश्यकता आहे.

तलाठ्यांकडे दोन-चार गावांची जबाबदारी असल्याने दाखल्यांसह किरकोळ कामासाठी नागरिकांना वाट पहावी लागत आहे. त्यामुळे अनेकांना योजनांचा लाभ मिळणेही कठीण बनत आहे. त्यामुळे रिक्त जागा त्वरित भरण्याची गरज आहे.  निपाणी तालुका घोषणा झाल्याने तालुकास्तरीय कार्यालये कधी सुरू होणार, याची संबंधित विभागालाही माहिती नाही. शासकीय अथवा महसूल पातळीवर कामकाजासाठी नागरिकांना चिकोडीला फेर्‍या माराव्या लागतात.

नूतन निपाणी तालुक्यासाठी मुख्य 43 गावांसह 10 वाड्या-वसती मिळून 53 गावे जोडली आहेत. पण महसूल विभागात निपाणी सर्कलमधील 29 गावे येतात. त्यासाठी केवळ 11 ग्रामतलाठी कार्यरत आहेत. निपाणी सर्कलमध्ये 27 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी रिक्त अधिकार्‍यांच्या जागा त्वरित भरण्याची मागणी होत आहे. WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19