Sat, Apr 20, 2019 09:51होमपेज › Belgaon › नोकरीसाठी ‘ऑनलाईन’ गंडा

नोकरीसाठी ‘ऑनलाईन’ गंडा

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 20 2018 1:10AMबेळगाव : प्रतिनिधी

बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे भरून घेऊन गंडा घातल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्याशिवाय नोकरीवर असलेल्या काही युवकांनीही मोठ्या पगाराच्या आमिषाने पैसे गमावले आहेत.

देशातील मोठमोठ्या कंपन्यांची नावे घालून नोकरीसाठी सोशल मिडियावरून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. आलेल्या अर्जातील ई-मेलवर नोकरीसाठी लागणारी कागदपत्रे म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, फोटो, रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रति मेल करावयास सांगण्यात येते.    

आठवडाभराच्या अवधीने अर्जधारकाच्या मेलवर मोठ्या कंपनीच्या नावावरून ऑफर लेटर पाठविण्यात येते. त्यामध्ये महिनाभराचा अवधी देण्यात येतो. ऑफर लेटरमध्ये कंपनीचे नाव, हुद्दा, एक ते तीन वर्षातील भलेमोठे अर्थिक पॅकेज याचा उल्लेख केलेला असतो. ऑफरलेटर आकर्षक बनविलेले असते. तुम्हाला ऑफर लेटरप्रमाणे नोकरी हवी असल्यास प्राथमिक खर्चासाठी खाते क्रमांकावर दहा हजार रुपयाची रक्कम भरण्याची सूचना केली जाते. 

मोठ्या पॅकेजचे अमिष भविष्यातील मोठ मोठी स्वप्ने पाहणारे युवक मागचा पुढचा विचार न करता दहा हजाराची रक्कम ऑनलाईन खात्यावर भरुन मोकळे झाले आहेत. महिनाभराच्या अवधीने ऑफर लेटर घेऊन सबंधीत कंपनीत नोकरीसाठी  मुंबई, हैद्राबाद येथे रुजू झाले. मात्र तेथे गेल्यानंतर आपण असे कुणालाही ऑनलाईन ऑफर व नियुक्ती लेटर पाठविलेले नाही, अशी माहिती समोर आल्याने आपली फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले आहे. 

अनेकांचा फसवणूक

बेळगाव, खानापूर, चंदगड, तालुक्यातील अनेक युवकांनी नोकरी मिळविण्याच्या प्रतत्नात ऑनलाईन दहा हजार रुपये गमावले आहेत. ऑफर लेटरवर असलेल्या पत्त्यावर  जाऊन कार्यालयाचा शोध घेण्याचा प्रयत्न करता अशा प्रकारचे कार्यालयाच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तक्रार केली तरी पोलिसांचे लचांड मागे लागेल, असा विचार करून पोलिसांत तक्रारीही झालेल्या नाहीत.

हे करण्याची गरज

कोणतीही नामांकित कंपनी संभाव्य कर्मचार्‍याकडून आधी पैसे भरून घेत नाही, हे ध्यानात ठेवा. तसेच  देशातील कोणत्याही नामांकित कंपनीचे एक कार्यालय मुंबई,  बंगळूर, पुणे, हैदराबाद या मोठ्या शहरांत असतेच. नामांकित कंपनीकडून ई-मेल आलेला असल्यास त्या कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधून खातरजमा करा.

नियोजनबद्ध फसवणूक

ऑफर लेटरमध्ये मोबाईल नंबर नमूद केलेला नाही. कार्यालयाची चौकशी मेलद्वारे काहीनी केली असता,  ‘आमची शाखा कोठेही नाही. कार्यालय स्थापन करून त्यावर होणारा खर्चाची बचत आम्ही केली आहे,’ अशी माहिती ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आली.