Thu, Apr 25, 2019 17:48होमपेज › Belgaon › कांदा जोमात, उत्पादक तोट्यात...

कांदा जोमात, उत्पादक तोट्यात...

Published On: Dec 08 2017 1:36AM | Last Updated: Dec 07 2017 8:30PM

बुकमार्क करा

निपाणी : मधुकर पाटील

चालूवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शिवारात रब्बीतील सर्व पिकांची वाढ चांगली झाली आहे. गेल्या पंधरवड्यापासून थंडीचा जोर वाढल्याने याचा फायदा कांदा पिकाला झाल्याने पीक जोमात आहे. गतवर्षी ऐन काढणीत या पिकाच्या दराने हात दाखवला. सध्या बाजारपेठेत  40 रु. किलो दर असला तरी व शिवारात क्षेत्र वाढले असले तरी पुढील दराची अनिश्‍चतता आहे. यामुळे उत्पादक शेतकरी  पुरता तोट्यात असल्यासारखी स्थिती आहे.

अनेक शेतकर्‍यांनी खरीपात झालेला तोटा, वेळेत घेता न आलेले एखाद्या पिकाचे उत्पादन व पुढे दर  चांगला लागला नाही तरी आहे त्या स्थितीत उभ्या असलेल्या पिकाच्या हातभारीसाठी म्हणून कांद्याचे  उत्पादन आंतरपीकाद्वारे घेतले आहे.यामुळे यंदा या पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. हे पाहता  उत्पादक शेतकर्‍यांचा पाय खोलात गेला असून पुढे ऐन काढणीत किती दर मिळेल, याची त्याला शाश्‍वती नाही.

पारंपरेनुसार खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात गारवा कांद्याचे उत्पादन घेतले जाते. एकेकाळी निपाणी परिसर तंबाखू, उसासह इतर पिकांसाठी प्रसिध्द होता. पण सहा वर्षात कृषी क्षेत्राचे चित्र पूर्णत: बदलले आहे. अनेक शेतकर्‍यांनी पारंपरिक पीक उत्पादनावरच भर दिला आहे. यंदा चांगल्या पावसामुळे त्याला खरीप वगळता सद्यस्थितीत रब्बी हंगामात अगदीच सोपे झाले आहे.

शेतकर्‍यांनी वेदगंगा व दूधगंगा नद्यांना असणार्‍या बारमाही पाण्याचा लाभ उठवत जो कारखाना अगोदर ऊस नेईल त्याला तो देऊन क्षेत्र रिकामे करून, खोडवा तसेच रब्बीतील पीक घेण्याचा सपाटा लावला आहे. काही शेतकर्‍यांनी का्ंद्यापाठोपाठ ऊस पिकातून गहु, हरभरा, मका यासह विविध भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे. गेल्या पंधरवड्यापासून थंडीचा जोर वाढल्याने कांदा पीक गारठले आहे. अपेक्षेप्रमाणे ऐन पीकवाढीच्या कालावधीत कांद्याला थंडीची साथ मिळाली आहे. यामुळे पीक चांगलेच सुधारले आहे. पंधरा वर्षापासून निपाणी भागातील कांद्याचा व उत्पादकांचा यशवंतपूर बाजारपेठेवर दबदबा आहे. असे असले तरी गेल्या वर्षीपासून यावर काहीसा परिणाम झाला आहे. यंदा चांगल्या पावसामुळे महाराष्ट्रातील नाशिक, लालसगाव  भागातही कांद्याचे उत्पादन भरमसाट झाले आहे. आधी याच भागातून बंगळूरच्या मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. यामुळे बाजारात ऐन काढणीपर्यंत सध्याचा दर टिकुन राहण्याची अपेक्षा उत्पादकांना आहे.