होमपेज › Belgaon › कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी

कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी

Published On: Mar 18 2018 11:39PM | Last Updated: Mar 18 2018 11:10PMबेळगाव : प्रतिनिधी

 सर्वत्र कांद्याचे उतरलेले भाव आणि उत्पादन घेण्यासाठी येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने निपाणी भागातील कांदा उत्पादकाच्याच डोळ्यात पाणी आले आहे. गत महिन्यात बंगळूर येथील यशवंतपूर मार्केटमध्ये कांद्याचा असणारा प्रतिकिलो 45 रुपयांचा  दर आता 8 ते 10 वर आल्याने उत्पादकांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या मार्केटमध्ये सद्यस्थितीत महाराष्टातील नाशिक, लोणंद तर कर्नाटकातील चित्रदुर्ग व बेळगाव जिल्ह्यातून कांद्याची आवक वाढल्याने दर कोसळले आहेत. यामुळे पीक घेण्यासाठी आलेला खर्च अंगावर आल्याने उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. राज्य सरकारने कांद्याला हमीभाव मिळवून देण्याची मागणी होत आहे.

कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असणार्‍या नाशिक, लोणंद या परिसरासह चित्रदुर्ग व आठ-दहा वषार्ंपासून  निपाणी भागाने बंगळूरच्या बाजारपेठेत आपले नाव कोरले आहे. यात सौंदलगा येथे रब्बी हंगामात गारवा जातीच्या कांद्याचे अमाप उत्पादन घेतले जाते. दरवर्षी रब्बी हंगामातील सुगीत जवळपास 300 ट्रक कांदा बंगळूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जातो. सध्या या भागातील कांदा काढणी निम्म्यावर आली आहे.

ऑक्टोबरनंतर कांदा उत्पादन

सुरवातीच्या पावसामुळे यंदा कांदा पिकाची लावणी लांबल्याने या पिकाच्या काढणीची कामेही लांबणीवर पडली आहेत. यामुळे शिवारात अजूनही निम्म्या क्षेत्रावरील काढणी शिल्लक आहे. खरीप सुगीनंतर ऑक्टोबरनंतर परिसरातील शेतकर्‍यांना कांदा उत्पादनाचे वेध लागतात. कांदा जुगारी पीक असले तरी आठ-दहा वर्षापासून या पिकावर परिसरातील शेतकर्‍यांची मदार आहे. अनेक शेतकरी या पिकाचे उत्पादन घेतात. प्रतिवर्षी ऐन कांदा काढणीवेळी बाजारपेठेत दर घसरतात. मात्र यंदाचा हंगाम त्याला अपवाद ठरला. सुरवातीपासून बाजारात कांद्याचे दर तेजीत राहिल्याने अनेक शेतकर्‍यांनी याचे उत्पादन हिंमतीवर घेतले. त्यासाठी महागड्या रोपाची जुळवाजुळव करून पाणी, रासायनिक खते, मजूरवर्ग इत्यादींचा ताळमेळ घालत पिकाचे हुकमी उत्पादन घेतले. निसर्गाची साथही चांगली मिळाली. सध्या प्रतिएकर कांदा लावण करण्यासाठी किमान 25 हजार रु. खर्च येतो.

पिकाची आवक वाढल्याने  दरात प्रचंड घसरण झाली आहे. बंगळूर येथील नटराज ट्रेडिंग कंपनीचे कांद्याचे होलसेल विके्रते शशिधर म्हणाले, सद्यस्थितीत गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने कांदा उत्पादकांनी भीतीपोटी काढणी जोमात सुरू केली आहे. यामुळे मार्केटमध्ये सुमारे 350 ट्रक आवक झाली आहे. आवक जास्त असली तरी मालाचा उठाव होत नाही. अद्याप किमान पंधरा दिवस अशीच स्थिती राहील. किलोचा भाव 8 ते 10 रुपयांवर आल्याने एकरी लावणीसाठी आलेला खर्च अंगावर आला आहे. शासनाने हमीभाव देऊन उत्पादकाला दिलासा देण्याची मागणी होत आहे.