Wed, Mar 27, 2019 01:57होमपेज › Belgaon › सात वर्गांसाठी एकच शिक्षक !

सात वर्गांसाठी एकच शिक्षक !

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 8:01PMखानापूर : प्रतिनिधी

कणकुंबीपासून आठ कि. मी.वर डोंगराच्या कपारीत वसलेल्या माण गावातील सरकारी मराठी प्राथमिक शाळेला गेल्या तीन वर्षापासून पूर्णवेळ शिक्षकासाठी झगडावे लागत आहे. निवेदनाशिवाय माणवासियांना शिक्षक मिळाला आहे. असे कधीच झाले नाही. यावर्षी तर पहिली ते सातवीपर्यंतचे सात वर्ग सांभाळण्यासाठी एकच शिक्षक देण्यात आला आहे. शिक्षणखात्याच्या बैठका, कार्यालयिन कामे आणि सात वर्गांच्या सर्व विषयांचे अध्यापन एकाच शिक्षकाला करावे लागत असल्याने 32 मुलांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

याबाबत सोमवारी माणवासियांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात दिवसभर तळ ठोकून शिक्षक नियुक्तीचा आदेश द्या. मगच कार्यालय सोडू, असा हेका लावून धरल्याने अधिकार्‍यांची भंबेरी उडाली. या अनोख्या आंदोलनात माणमधील प्रत्येक घरातील एक व्यक्‍ती सहभागी झाली होती.दुर्गमपणामुळे मागासलेपणाचे जीवन नशिबी आले मात्र आपली मुले तरी शिकून पुढे जावीत. अशी आशा बाळगून असलेले माणकर शिक्षणाविषयी प्रचंड जागरुक आहेत. पहिली ते सातवीपर्यंतचे सर्व वर्ग गेल्या वर्षभरापासून एकच शिक्षक सांभाळत आहेत. मध्यान्ह आहार, पुस्तक वितरण, शासकिय योजनांची कार्यवाही, सभा, बैठका आदी बिगर शैक्षणिक कामेही त्यानांच करावी लागत असल्याने अशावेळी मुलांना वार्‍यावर सोडावे लागत आहे. अतिथी शिक्षकांच्या यादीत एक कन्नड व एक मराठी शिक्षक देण्याचे मान्य करण्यात आले असले तरी घनदाट जंगलात सात हजार रुपयाच्या मानधनावर सेवा करण्यास फारसे कोणीच इच्छुक नसल्याने कोणी शिक्षक देता का? असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

तब्बल 37 वर्षे एकाच शाळेत अध्यापनाचे काम केलेल्या तुकाराम गुरव यांच्या निवृत्तीनंतर माण सरकारी प्राथमिक शाळेत जायला एकही शिक्षक तयार नाही. दुर्गम भाग आणि संपर्काच्या साधनांचा अभाव यामुळे कोणीच या शाळेची जबाबदारी स्वीकारायला पुढे येत नाही. परिणामी गेल्या तीन वर्षापासून अतिथी शिक्षक आणि त्यानंतर आता एक शिक्षकी अध्यापनाच्या आधारावर माण शाळेचा गाडा हाकण्यात येत आहे.किमान एका कायमस्वरुपी मराठी व कन्नड शिक्षकाची तरी सोय करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष शांताराम गावकर, ग्रा. पं. सदस्य पुनाजी गावकर, आप्पाजी गावकर, ब्रम्हदेव गवस, विजय गावकर, सीताराम आवकर, महादेव गवस आदी उपस्थित होते.