होमपेज › Belgaon › तरुणाईचा जीव तुटतो मराठीसाठी

तरुणाईचा जीव तुटतो मराठीसाठी

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 11 2018 11:41PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

भाषा हे संवादाचे माध्यम आहे. जागतिकीकरणाच्या कालखंडात स्थानिक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जगाची भाषा म्हणून वेगळीच भाषा उदयाला येत आहे. ती युवकांकडून आत्मसात केली जात असून प्रांत, देश, खंडाच्या भिंती धडाधड कोसळत आहेत.

अशा संक्रमणावस्थेत सीमाभागातील युवा पिढी मराठी भाषा व सीमाप्रश्‍नाकडे कोणत्या नजरेने पाहते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 

आजच्या युवा पिढीला कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी दाही दिशा साद घालत असल्या तरी मातृभाषा व मातीची हाकदेखील तितकीच भावते. यामुळे त्यांच्याकडून सीमाप्रश्‍न आणि मराठी भाषेविषयी आग्रही मते मांडण्यात येतात. सीमालढ्यात सध्या चौथी पिढी सक्रिय आहे. सीमालढा एकेकाळी केवळ वयोवृद्धांचा म्हणून ओळखला जात असे. ही ओळख मागे पडून लढ्यात पुन्हा तरुणाईची सळसळ ऐकू येत आहे. त्यांचा सहभाग वाढत आहे. ही तळमळ केवळ भाषेच्या प्रेम व आस्थेतून घडत आहे.

मेळाव्यात आज होणार सीमाप्रश्‍नाचा जागर

बेळगाव : प्रतिनिधी

सीमाप्रश्‍न न्यायालयात असून येत्या काळात निर्णय लागणार आहे. तोपर्यंत मराठी भाषिकांनी संघटित राहून येथील सत्तेच्या विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. नागरिकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा प्रबळ आहे. आजच्या मेळाव्यात ही इच्छा प्रकट करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन ता. पं. सदस्य नारायण नलवडे यांनी केले. बाकमूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात बुधवारी ग्रामस्थांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी दत्तु मजुकर होते.

नलवडे म्हणाले, सीमाप्रश्‍नाचा लढा समितीकडून निष्ठेने चालविला जात आहे. याला मराठी भाषिकांकडून साथ मिळत असून न्याय मिळेपर्यंत झुंज देत राहणे आवश्यक आहे. युवा मेळाव्यात सीमाप्रश्‍नी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, बाकमूर भागाने म. ए. समितीला नेहमीच  साथ दिली आहे. हा भाग पूर्णपणे मराठी असून अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्यानंतर येथली संस्कृती उद्ध्वस्त करण्याचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. यामुळे युवकांनी आणि नागरिकांनी सावध होण्याची वेळ आली आहे. 

युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील म्हणाले, मराठी युवकांना सरकारी नोकरीत डावलण्यात येते. यामुळे त्यांना बेकारीचा सामना करावा लागत आहे. केवळ कानडीतून कागदपत्रे पुरविण्यात येत असल्यामुळे मराठीचे खच्चीकरण सुरू आहे. या भागातून मराठी हद्दपार करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असून मेळाव्यातून युवकांनी ताकद दाखवून द्यावी. यावेळी दत्तू मजुकर, रवळू गोडसे यांनी ग्रामस्थातर्फे पाठिंबा व्यक्त करून मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीला नारायण गोडसे, रामलिंग सुतार, पी. पी. बेळगावकर, तुकाराम पाटील, नाना मजुकर, विठ्ठल गोडसे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान बिजगर्णी येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी मेळाव्याला पाठिंबा व्यक्त करून मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार केला. यावेळी युवा आघाडीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.