Tue, Apr 23, 2019 13:38



होमपेज › Belgaon › विरोधक एकत्र आल्यास मोदी पराभूत ः राहुल

विरोधक एकत्र आल्यास मोदी पराभूत ः राहुल

Published On: Apr 09 2018 1:52AM | Last Updated: Apr 09 2018 1:52AM



बंगळुरू : वृत्तसंस्था 

सर्व विरोधक एकत्र आल्यास 2019च्या निवडणुका जिंकणे तर सोडाच; पण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही वाराणसीत पराभूत होऊ शकतात, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. कर्नाटक विधानसभेच्या प्रचारासाठी सुरू असलेल्या जनाशीर्वाद यात्रेच्या सहाव्या टप्प्यात राज्याच्या दौर्‍यावर असलेल्या राहुल यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. 

सपा, बसपा व इतर सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष भाजपविरोधात काँग्रेससोबत एकत्र येतील, असा ठाम विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. आपापसातील मतभेद मिटवून भाजपसमोर एक सशक्‍त पर्याय उभा केला जाईल, असे सांगतानाच तिसर्‍या आघाडीची शक्यता मात्र त्यांनी फेटाळून लावली. 

विरोधकांची एकजूट एका विशिष्ट पातळीच्या वर पोहोचली आहे. काही किरकोळ मतभेद, प्रश्‍न असल्यास त्याची एकजुटीला बाधा येणार नाही. त्यामुळे आता भाजपला निवडणूक जिंकणे अवघड आहे, असा दावा राहुल यांनी केला. दलित अत्याचाराबाबतच्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले की, पुढली निवडणूक भाजप जिंकेल, असे मला वाटत नाही. त्यामुळे 2019 मध्ये देशातील सामाजिक परिस्थिती पूर्ववत सामान्य होईल. 

उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूतील निवडणुकांच्या दृष्टीने भाजपविरोधात सर्व समविचारी पक्ष एकत्र येत आहेत. अशा स्थितीत ते (भाजप) कुठून निवडणूक जिंकणार? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि पंजाब आम्ही त्यांच्याकडून हिसकावून घेऊ, असा ठाम विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

आम्ही घमेंडी नाही... 

भाजपविरोधात एकत्र येऊ पाहणार्‍या प्रत्येक पक्षात स्वतंत्र महत्त्वाकांक्षा आहे. अशा स्थितीत विरोधी एकजूट कशी शक्य आहे, या प्रश्‍नावर राहुल गांधी म्हणाले, लोकांना कसे सांभाळावे याचा काँग्रेसला चांगला अनुभव आहे. आम्ही घमेंडी नाही. आम्ही लोकांवर दडपण आणत नाही, त्यांचे जीवन उद्ध्वस्त करत नाही. त्यामुळे आम्ही हे नक्‍कीच सांभाळून घेऊ. मोदी आणि आरएसएस यांनी  देशाला ज्या वाईट परिस्थितीत ढकलले आहे, त्यातून देशाला बाहेर कसे काढायचे, हाच सध्याचा स्थितीत महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 

चीनशी स्पर्धेसाठी रोजगारनिर्मिती आवश्यक

तत्पूर्वी, राहुल यांनी कर्नाटकातील उद्योजकांशीही चर्चा केली. आगामी 30 वर्षे भारताला सर्वच क्षेत्रात चीनशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. त्यासाठी रोजगारनिर्मितीत वाढ केली, तरच केंद्र सरकार या देशातील तरुणांच्या मनात विश्‍वास निर्माण करू शकेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्‍त केले. 

सफाई कामगारांसाठी कर्नाटक मॉडेल 

काँग्रेस सत्तेवर आल्यास सफाई कामगारांच्या कल्याणाचे कर्नाटक मॉडेल देशात राबवू, असे आश्‍वासन राहुल गांधी यांनी दिले. कर्नाटकने सफाईतील ठेकेदारी पद्धत संपुष्टात आणली आहे. त्याऐवजी सफाई कामगारांना सरकारी सेवेत सामावून घेऊन त्यांना 7,500 वरून 18,000 पर्यंत वेतनवाढ देण्यात आली आहे. 

Tags : Karnataka state tour Rahul, Sunday dialogue with reporters