Sat, Feb 23, 2019 16:38होमपेज › Belgaon › प्रेयसीला चंद्राची उपमा नको.... मधुचंद्र वर्ज्य!

प्रेयसीला चंद्राची उपमा नको.... मधुचंद्र वर्ज्य!

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 01 2018 11:49PMबेळगाव : प्रतिनिधी

बुधवारी आकाशात खग्रास चंद्रग्रहणाचा अद्भूत नजारा खगोल अभ्यासकांसह नागरिकांनी पाहिला. सोशल मीडियावर चंद्रग्रहणाच्या जोक्सनी धूमाकूळ माजवला. बुधवारी चंद्रग्रहण जवळ येत होते, तशी सोशल मीडियावर संदेशाची देवाणघेवाण सुरू होती. ग्रहणकाळात सोशल मीडियावर घ्यावयाची काळजी या शीर्षकाखाली संदेश पाठविले जात होते. 

ग्रहणकाळात व्हॉट्स अ‍ॅपवरून खाद्यपदार्थांचे फोटो फॉरवर्ड करू नयेत. नेटवर्क रेंज दूषित असते. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर डीपी म्हणून तुळशीपत्र ठेवावे. गरोदर स्त्रियांनी ऑनलाईन राहू नये, वायफाय आणि मोबाईल डेटा ऑफ करावा. देवतांचे फोटे व स्तोत्र फॉरवर्ड करावेत. ग्रहणकाळात चंद्राचे जुने फोटो फॉरवर्ड करू नयेत. प्रेयसीच्या चेहर्‍याला चंद्राची उपमा देऊ नये. मधुचंद्र वर्ज्य आहे. चंद्राचा उल्लेख असलेली कोणतीही गाणी ऐकू नयेत किंवा वाजवू नयेत. चंद्रकांत, सूर्यकांत यांचे सिनेमे टाळावेत. अगदीच नाईलाज असल्यास काळा गॉगल घातलेले डीपी किंवा फोटो अपलोड करावेत. पण हॅशटॅगमध्ये गोमूत्र हा शब्द असावा किंवा फिलिंग शुद्ध असे लिहावे. संगमावर डुबकी मारताना मोबाईलला प्लास्टिक गुंडाळून सोबत ठेवावा. 

ग्रहणकाळात असलेले डीपी, स्टेटस ग्रहण संपल्यानंतर त्वरित बदलावेत, आदी जोक्सनी बुधवारी दिवसभर व रात्रभर थैमान माजविले होते. बुधवारी सायंकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी ग्रहणस्पर्श झाला. 8 वाजून 42 मिनिटांनी ग्रहण सुटले. सुपर मून, ब्लड मून व ब्ल्यू मूनचेही दर्शन 31 जानेवारीच्या एकाच दिवशी घडले. याचेच थोडे चांगले व थोडे खोडसर जोक्स फिरत होते. यापूर्वी चेन्नई आदी भागात ओखी वादळाने थैमान माजविले होते. त्यावेळीही अशा प्रकारच्या जोक्सनी धुमाकूळ माजविला होता.