Mon, Jun 17, 2019 04:38होमपेज › Belgaon › हुतात्मा दिन १७ रोजी गांभीर्याने पाळणार

हुतात्मा दिन १७ रोजी गांभीर्याने पाळणार

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 06 2018 11:22PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

भाषावार प्रांतरचना करताना अन्यायाने मराठी भाग कर्नाटकात डांबण्यात आला. त्याविरोधात सीमाभागात आगडोंब उसळला. यामध्ये अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बुधवार दिनांक 17 रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचा ठाम निर्धार, मध्यवर्ती म. ए. समितीने केला. मराठा मंदिरात शनिवारी मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी होते.

दळवी म्हणाले, भाषावार प्रांतरचना करताना मराठी भाग कर्नाटकात डांबण्यात आल्याची माहिती सीमाभागात समजताच मराठी जनता या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरली. त्यावेळी झालेल्या गोळीबारात हुतात्म्यांनी आपल्या छाताडावर गोळ्या झेलल्या. मराठी भाषेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी हुतात्मादिन गांभीर्याने पाळणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. यासाठी घटक समितीने कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले, हुतात्मा दिन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे उपस्थितीत राहावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  17 रोजी  सकाळी 8 वा. हुतात्मा चौकात अभिवादन करण्यात येईल. यावेळी त्यांनी महामेळाव्याला अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हजेरी लावणार्‍या आ. जयंत पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. संध्यादेवी कुपेकर, माजी आ. के. पी. पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली.