Thu, Apr 25, 2019 12:00होमपेज › Belgaon › खानापुरातील जुने अधिकारी बॅक टू पॅव्हेलियन

खानापुरातील जुने अधिकारी बॅक टू पॅव्हेलियन

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 8:12PMखानापूर : प्रतिनिधी

गत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खानापुरातून बाहेरच्या जिल्ह्यात बदली झालेले अधिकारी जुन्या जागी येऊन स्थिरावत आहेत. मंडल पोलिस निरीक्षकपदी आय. एस. गुरुनाथ, पोलिस उपनिरीक्षकपदी परशराम पुजेरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यापाठोपाठ तहसीलदार व तालुका दंडाधिकारीपदी शिवानंद उळागड्डी यांनीही सूत्रे स्वीकारल्याने खानापूरकरांना पुन्हा एकदा जुने अधिकारी मिळाले आहेत.

निवडणुकीच्या पारदर्शक प्रक्रियेसाठी स्थानिक अधिकार्‍यांची ते ज्या जिल्ह्यात कार्यरत होते. त्या जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली होती. त्यानुसार खानापूर पोलिस स्थानकाचे पो. उपनिरीक्षक परशराम पुजेरी यांची बागलकोट जिल्ह्यातील नवानगर पोलिस स्थानकात तर नंदगड पोलिस स्थानकाचे पो. उपनिरीक्षक यु. एस. आवटी यांची विजापूर शहर पोलिस स्थानकात बदली करण्यात आली होती. तर मंडल पो. नि. आय. एस. गुरुनाथ यांची धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद येथे बदली झाली होती. यापैकी पुजेरी आणि गुरुनाथ हे मूळ जागी पुन्हा हजर झाले असून नुकताच दोघांनीही पदभार स्वीकारला आहे. निवडणुकीपूर्वी नंदगड पोलिस उपनिरीक्षकपदी कार्यरत असलेले यु. एस. आवटी यांची आता विजापूर जिल्ह्यातील चडचण येथे बदली झाली आहे. तथापि पोलिस अधिकार्‍यांच्या सामान्य बदल्यांची प्रक्रिया अद्याप पार पडलेली नाही. त्यामुळे सध्या मूळ जागी आलेले अधिकारी त्याच जागी कायम राहतील की नाही, याबाबत साशंकता आहे. तरीही फिल्डींग लावून आहे त्याच जागी सेवा करण्याची संधी मिळावी, याकरिता अधिकार्‍यांकडून खटपट सुरुच आहे.

निवडणुकीपूर्वी खानापूरचे तहसीलदार शिवानंद उळागड्डी यांची यल्लापूरच्या तहसीलदारपदी बदली करण्यात आली होती. निवडणूक काळासाठी खानापूरची जबाबदारी दिनमणी हेगडे यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र हेगडे यांचीही त्यांच्या मूळ जागी बदली करुन खानापूरचा ताबा पुन्हा उळागड्डी यांच्याकडे देण्यात आला आहे.उळागड्डी यांनी शनिवारी सूत्रे स्वीकारुन तलाठी, महसूल निरीक्षक यांची बैठक घेऊन पावसाळ्यातील संभाव्य खबरदारी उपाययोजनांची माहिती घेतली. बदली झालेल्या अधिकार्‍यांना निवडणुकीनंतर पुन्हा जुनी जागा मिळेल की नाही, ही चिंता लागून होती. मात्र त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जुन्या जागी वर्णी लागल्याने अधिकारी हरखून गेले आहेत. त्यांच्याकडून जनतेची कामेही त्याच उर्मीने व्हावीत, अशी अपेक्षा सर्वसामान्य खानापूरकर व्यक्त करताना दिसत आहे.