Tue, Jul 23, 2019 10:32होमपेज › Belgaon › मार्कंडेय नदीमध्ये वृध्देचा बुडून मृत्यू

मार्कंडेय नदीमध्ये वृध्देचा बुडून मृत्यू

Published On: Jul 22 2018 1:02AM | Last Updated: Jul 21 2018 11:42PMकडोली : वार्ताहर

काकती येथील बेपत्ता वृध्देचा मृतदेह शनिवारी कडोली-काकती पुलाशेजारी मार्कंडेय नदीत सापडला. बुधवारी पुलावर पाणी आलेले असताना त्या पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात नदीत बुडाल्या, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. लक्ष्मी मारुती टुमरी (वय 68) त्या वृध्देचे नाव आहे.

काकती मारुती गल्लीच्या रहिवाशी लक्ष्मी आपल्या कडोली येथील माहेरगावी नातेवाईकांना भेटण्यासाठी वारंवार जात असत. काकतीशेजारी नदीकिनारीच त्यांचे शेत आहे. तर नदीच्या पलीकडे नातेवाईकांचे शेत आहे.

बुधवारी घरातून निघालेल्या लक्ष्मी पुलाजवळ येताच पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात पडल्या असण्याचा अंदाज आहे. नव्यानेच कडोली-काकती मार्गावर पूल बांधण्यात आला असून, बुधवारी पहिल्यांदाच पुलावर पाणी आले होते. या पाण्याचा तिला अंदाज आला नसावा म्हणून ती पाण्यात पडली, असे येथील नागरिकांनी सांगितले. पुलापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या विलायती चिंचेच्या झाडाच्या काटेरी फांद्यांना तिची साडी अडकली होती. त्यामुळे मृतदेह सापडला. तो पात्राबाहेर काढण्यास तब्बल एक तास लागला. 

घटनास्थळी काकतीचे सीपीआय रमेश गोकाक, पीएसआय अर्जुन हंचीनमणी आणि सहकार्‍यांनी भेट देऊन पंचनामा केला.शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन विवाहित कन्या असा परिवार आहे.