Tue, Aug 20, 2019 04:07होमपेज › Belgaon › नमस्कार, मी रामलू बोलतोय, किती कोटी पाहिजे?

नमस्कार, मी रामलू बोलतोय, किती कोटी पाहिजे?

Published On: May 20 2018 1:41AM | Last Updated: May 20 2018 1:16AMबंगळूर : प्रतिनिधी

‘नमस्कार, मी श्रीरामलू बोलतोय. तुम्ही किती रकमेची अपेक्षा ठेवलीय’, असे विचारले गेले, तर आमदाराने काय करायचे? 

नेमकी तीच अवस्था काँग्रेस आमदार बी. सी. पाटील यांची झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. भाजप नेते बी. श्रीरामलू आणि मुरलीधर राव यांनी मोबाईलवर संपर्क साधून काँग्रेस आमदार बी. सी. पाटील यांनाकोट्यवधीची ऑफर दिल्याची ध्वनिफीत काँग्रेसने जारी केली आहे. त्यातील बातचीत अशी ः

श्रीरामलू ः नमस्कार, मी रामलू बोलतोय.
बी. सी. पाटील ः नमस्कार
श्रीरामलू ः किती कोटींची तुमची अपेक्षा आहे?
पाटील ः साहेबांनी काहीच सांगितलेले नाही.
रामलू ः तुम्ही सांगा किती द्यायचे ते.
पाटील ः नाही, ते तुम्हीच सांगा.
रामलू ः मला 25 कोटी सांगितले होते. तुम्ही किती जण आहात?

पाटील ः माझ्यासोबत 3-4 जण आहेत. त्यांनाही मला रक्‍कम सांगावी लागेल.
रामलू ः मी त्यांना 10 ते 15 देईन.
पाटील ः त्यांना पद काय मिळणार?
रामलू ः त्यांना मंत्री बनवू.
पाटील ः माझ्या मतदार संघात प्रतिस्पर्धी उमेदवार सक्षम आहे. फेरनिवडणूक झाली, तर माझी कोंडी होईल.

रामलू ः घाबरू नका, फेरनिवडणूक होणार नाही. तेलंगणा, पाँडेचेरीप्रमाणे आम्ही आमचा विधानसभा अध्यक्ष निवडू. त्यामुळे आमदार अपात्र ठरवले जाणार नाहीत. निवडणुकीची चिंताच सोडा. मुरलीधर रावही आहेत, त्यांच्याकडे फोन देतो. त्यांच्याशी बोला.
राव ः तुम्ही राजीनामे देण्याचा प्रश्‍नच येत नाही. फेरनिवडणुकीबाबत विचारच करू नका.
पाटील ः माझ्यासोबत 3-4 लोक असल्यामुळे तुम्ही मला आकडा सांगा.
रामलू ः आकडा त्यांना विचारू नका. मी तुम्हाला 15 हा आकडा आधीच सांगितलाय.
राव ः  फेरनिवडणूक गरजेची नाही, राजीनामा-अपात्रता असे काही होणार नाही. प्रश्‍न फक्‍त विधानसभा अध्यक्षांचा आहे. देशभर हेच चाललेय.
इतके संभाषण ध्वनिफितीत आहे. रेड्डी बंधू आणि श्रीरामलू तसेच भाजप नेते मुरलीधर राव यांनी काँग्रेस आमदारांना आमिषे दाखवल्याचा आरोप काँग्रेसने याच ध्वनिफितीच्या आधारे केला आहे.