Tue, Jul 23, 2019 10:30होमपेज › Belgaon › गांजावर आता ‘ड्रोन’ची नजर

गांजावर आता ‘ड्रोन’ची नजर

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 03 2018 7:12PMबेळगाव : प्रतिनिधी

शेतात पिकांमध्ये चोरट्या पद्धतीने गांजा पिकविण्यात येत असल्याचे सहजासहजी लक्षात येत नाही. त्यासाठी आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ड्रोन कॅमेर्‍यातून शोध घेतल्याने कितीही छुप्या पद्धतीने गांजा पिकविला तरी तो शोधणे शक्य होणार आहे. याचा यशस्वी प्रयोग नुकताच शिमोगा येथील माळेकोप (ता. सोरब) येथे करण्यात आला. सुमारे 5 किलो गांजा शेतातून जप्‍त करण्यात आला.

कर्नाटकात सर्वाधिक गांजा पिकविण्याच्या बाबतीत शिमोग्याचे नाव अग्रस्थानी आहे. राज्यातील काँग्रेस-निजद आघाडी सरकारने अमली पदार्थाविरोधी कठोर उपाययोजना केली असून आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. याबाबतचा प्रयोग आता यशस्वी झाल्याने संपूर्ण राज्यात गांजा पीक शोधण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. ऊस किंवा विविध पिकांमध्ये न दिसेल असा गांजा पिकविला जातो. पण, या वनस्पतीचा वापर नशेसाठी केला जात असल्याने त्यावर बंदी आहे. गुन्हेगारी जगतात याला मागणी असल्याने अनेकजण छुप्या पद्धतीने गांजा पिकवितात. काही दिवसांपूर्वीच शासनाने ड्रोन वापराचा निर्णय घेतला. कोणत्याही ठिकाणी पीक असले तरी ड्रोनच्या कॅमेर्‍यात ते दिसून येते. त्यामुळे गांजा पिकविणार्‍यांत याद्वारे भीती निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

शिमोगा जिल्हा अबकारी खात्याचे उपायुक्‍त वाय. आर. लोकेश यांच्या नेतृत्वाखालीलर पथकाने खात्रीलायक माहितीनुसार सारेकोप (ता. सोरब) येथे छापा घातला. सुपारी, सुंठ पिकामध्ये पिकविलेले सुमारे 5 किलो गांजा जप्‍त करण्यात आला. नागप्पा नामक शेतकर्‍याला अटक करण्यात आली. या परिसरात अनेक शेतकरी गांजा पिकवत असल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली आहे. संबंधित कायदा आणि त्यासाठी असणार्‍या शिक्षेबाबत अधिकारी जागृती करत आहेत. 

बेळगावातही गांजाचे पीक

काँग्रेस-निजद आघाडी सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात अमलीपदार्थाविरोधी कठोर कारवाईबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी कर्नाटकाला ‘उडता पंजाब’ बनू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी सांगितले होते. बेळगावात काही ठिकाणी गांजा पिकविण्यात येत असून अमली पदार्थांचा सुळसुळाट असल्याचे त्यांनी सांगितले होतेे. त्यामुळे बेळगावातील गांजा पिकविणार्‍यांनी आता ड्रोनचा धसका घेतला आहे.