Sun, Oct 20, 2019 11:26होमपेज › Belgaon › आता चर्चा भाजप-निजद युतीची

आता चर्चा भाजप-निजद युतीची

Published On: Jul 12 2019 8:21AM | Last Updated: Jul 12 2019 12:27AM
बंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेस-निजद आघाडी सरकारवर संकट कोसळल्याने आता भाजप-निजद युती सरकार अस्तित्वात येण्याची अफवा पसरली आहे. यात भर म्हणून या दोन्ही पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांची भेट झाल्याने याविषयी आणखी चर्चा सुरु झाली आहे.

गुरुवारी रात्री मुख्यमंत्री कुमारस्वामींचे निकटवर्तीय मंत्री सा. रा. महेश यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीधर राव, के. एस. ईश्‍वरप्पा यांची के. के. गेस्ट हाऊसमध्ये भेट घेतली. एका बंद खोलीत त्यांनी अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर ते आपापल्या खोलीकडे निघून गेल्याचे समजते. याविषयी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सदर खोलीकडे कुणालाही न सोडण्याची सूचना देण्यात आली होती. अर्ध्या तासानंतर ते तिघेही बाहेर आले.

याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसारित झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये खळबळ माजली. ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार आदींनी निजद नेत्यांकडे चौकशीला प्रारंभ केला. क्षणाक्षणाची माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली.

भाजपचे ज्येष्ठ नेते गेस्ट हाऊसवर भेटले. जुना परिचय असल्याने एकमेकांची विचारपूस झाली. कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही.
-सा. रा. महेश मंत्री, पर्यटन खाते

भाजप-निजद युती सरकार स्थापन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही. तसा विचारही केलेला नाही. मंत्री महेश व इतरांशी केवळ औपचारिक भेट घेतली. याचा वेगळा अर्थ काढू नये.
-मुरलीधर राव प्रभारी, कर्नाटक भाजप